भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण गुरूवारी ते विधीमंडळात चक्क आपली आलिशान गाडी घेऊन आले होते. एकीकडे दुष्काळ आणि कर्जाच्या डोंगरामुळे महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय तर दुसरीकडे मात्र आमदार साहेब आलिशान गाडीतून विधीमंडळात येताना दिसल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

आपली साडेपाच कोटींची आलिशान लिंबॉर्गिनी गा़डी घेऊन गुरूवारी नरेंद्र मेहता विधीमंडळात आले होते. अर्थात बाहेर पत्रकारांचा ताफा उभा होता. न्यूज चॅनेलच्या कॅमेरामनला पाहताच आमदार नरेंद्र मेहता मागच्या पावली परतले. वाद नको म्हणून आल्या पावलीच ते मागे फिरले. आपल्या आलीशान गाडीमुळे गेल्यावर्षी ते चांगलेच चर्चेत आले होते. लिंबॉर्गिनी प्रकरण त्यांना चांगलच भोवलं होतं. आपल्या पत्नीला तिच्या वाढदिवसाच्यादिवशी साडे पाच कोटींची गाडी त्यांनी भेट म्हणून दिली होती. दुस-या दिवशी त्यांच्या पत्नीने रस्त्यात उभ्या असलेल्या रिक्षाला ही गाडी ठोकली होती. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात रिक्षा चालकही जखमी झाला होता पण त्याने तक्रार मात्र नोंदवली नव्हती. नरेंद्र मेहता हे मीरा भाईंदरमधील भाजपचे आमदार आहेत. ते आमदार आहेत पण बिल्डर देखील आहेत. ज्यांच्याकडे जी आलिशान लिंबॉर्गिनी गाडी आहे ती देशात फक्त काही लोकांकडेच आहे.