scorecardresearch

महिंद्राची जाहिरात शूट करताना अजय देवगण संतापला; आनंद महिंद्रा म्हणाले, “मी लगेच शहर…”

अजय देवगण महिंद्राच्या जाहिरात शूटदरम्यान संतापल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Bollywood Actor Ajay Devgn, Mahindra Ad Shoot, Anand Mahindra
अजय देवगण महिंद्राच्या जाहिरात शूटदरम्यान संतापल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण महिंद्राच्या जाहिरात शूटदरम्यान संतापल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वारंवार स्क्रिप्ट बदलली जात असल्याने ब्रॅण्ड एम्बेसिडर असणारा अजय देवगण चिडल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओची दखल महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीदेखील घेतली असून ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय झालं?

व्हिडीओत अजय देवगण चिडलेला दिसत असून वारंवार स्क्रिप्ट का बदलत आहात? अशी विचारणा करताना दिसत आहे. यावर कॅमेऱ्यामागे असलेली व्यक्ती फक्त चार वेळा बदलली आहे असं उत्तर देते. यानंतर अजय देवगण निरुत्तर झाल्याप्रमाणे पाहत राहतो.

आनंद महिंद्रांचं ट्वीट –

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला असून, “मला अजय देवगण महिंद्राच्या शूटदरम्यान संतापल्याचं सांगण्यात आलं आहे आमच्या एखाद्या ट्रकमधून तो माझ्या मागे येण्याआधी मी शहर सोडलेलं बरं”, असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमका प्रकार काय?

महिंद्रा ग्रुपचा हा एक पब्लिसिटी स्टंट असून आनंद महिंद्रादेखील यामध्ये सहभागी झाले होते. हा एक ठरवून कऱण्यात आलेला व्हिडीओ होता. या व्हिडीओच्या शेवटीदेखील पाहत राहा असं सांगण्यात आलं आहे.

आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर त्यावर अनेकांनी लाईक्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. जाहिरात करण्याची ही चांगली पद्दत असल्याचं एका ट्विटर युजरने म्हटलं आहे. एका युजरने तर अजय देवगण दोन ट्रकमध्ये येईल, तुम्हाला त्याच्या स्टंट्सची कल्पना नाही अशी मजेशीर कमेंट केली आहे, ज्यावर आनंद महिंद्रांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात अजय देवगणने महिंद्रासाठी आपला प्रसिद्ध ‘फूल और काँटे’ मधील स्टंट केला होता. यावेळी आनंद महिंद्रा यांनी ट्विटरला जाहिरात शेअर केली होती तर अजय देवगणने शुभेच्छा देत आभार मानले होते.

दरम्यान सोशल मीडियावर सध्या अजय देवगणचा व्हिडीओ आणि आनंद महिंद्रांच्या ट्वीटची चांगलीच चर्चा रंगली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bollywood actor ajay devgan lost his cool during mahindra ad shoot anand mahindra reacts sgy

ताज्या बातम्या