डिसेंबर महिन्यात Better.com नावाची एक कंपनी चांगलीच चर्चेत होती. कंपनीचे सीईओ विशाल गर्ग यांनी तीन मिनिटांच्या झूम कॉलदरम्यान कंपनीतील ९०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं होतं. आता याची आठवण काढण्याचं कारण म्हणजे असाच एक प्रकार आणखी समोर आला आहे. यावेळी झूम कॉलदरम्यान तब्बल ८०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आलंय.
ब्रिटीश शिपिंग कंपनी, P&O फेरीने, त्यांच्या ८०० कर्मचाऱ्यांना झूम कॉलद्वारे त्यांना कामावरून कमी केल्याची माहिती दिली. अगदी तीन मिनिटांत ८०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी झाल्याचं सांगितलं. १७ मार्च रोजी या शिपिंग कंपनीने आपल्या कर्मचार्यांना एका मोठ्या घोषणेबद्दल माहिती देण्यासाठी एक व्हिडीओ मेसेज पाठवला.
त्यात म्हटलं होतं की, “कंपनीने निर्णय घेतला आहे की यापुढे जहाजं तिसऱ्या पार्टीकडून तयार केली जातील. त्यामुळे, तुम्हाला कळवण्यात आम्हाला खेद वाटतो की, तुमची नोकरी तात्काळ संपुष्टात आली असून आज तुमच्या नोकरीचा शेवटचा दिवस आहे.” सर्व कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असंही या व्हिडीओमध्ये म्हटल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलंय.
कर्मचार्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता काढून टाकण्यात आले होते, परंतु कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दावा केला आहे की त्यांना ईमेल, पोस्ट, कुरिअर आणि टेक्स्ट मेसेजद्वारे माहिती देण्यात आली होती. P&O Ferris या कंपनीचे दोन वर्षांत २०० दशलक्ष पाऊंडचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ८००हून अधिक लोकांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता, असं कंपनीने एका निवेदनात म्हटलंय.