ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती नेहमी चर्चेत असतात. अशातच सोशल मीडियावर त्यांची एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे; ज्यात त्यांनी त्यांच्या आनंदी नात्याचे रहस्य उघड केले आहे. ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांनी एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी सामायिक मूल्ये आणि हितसंबंधांबद्दल यात सविस्तररीत्या सांगितले. या पोस्टमधून या जोडप्याच्या वैयक्तिक आयुष्याची त्यांच्या आनंदी नात्याची एक झलक पाहायला मिळते. या जोडप्याने वारंवार विचारल्या जाणाऱ्या एका प्रश्नाचे उत्तर दिले आहेत.
मूर्ती आणि सुनक यांनी पोस्टमध्ये लिहिले की, लोकांकडून आम्हाला नेहमी विचारले जाते, तुमच्या दोघांमध्ये सर्वांत जास्त कॉमन गोष्ट कोणती?
त्यावर त्यांनी उत्तर देत लिहिले, “आम्हा दोघांना केवळ मित्रांना भेटणे आणि स्पॅनिश खाद्यपदार्थ खाणं इतकंच आवडत नाही. याच गोष्टीवर आमचं प्रेम नाही, तर जगण्यातील काही मूल्यं आहेत ती आम्हाला एकमेकांशी सामायिक करायला आवडतात. जीवनात तुम्हाला कुठे जायचं हे कठोर परिश्रम करून ठरवलं पाहिजे, असं आमच्या दोघांचं मत आहे. बदल घडवून आणण्यासाठी धाडसी पावलं उचलणं आवश्यक आहे, हेही आम्ही दोघं मान्य करतो.”
मुलांच्या भवितव्याविषयी ऋषी सुनक – अक्षता मूर्ती काय म्हणाले?
मूर्ती आणि सुनक यांनी या पोस्टमध्ये पुढे म्हटले, “आमच्या मुलांना आजच्या जगापेक्षा चांगले जग मिळेल, अशी आम्हाला आशा आहे. हॅरोमधील लोकांशी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मूल्यांबद्दल आणि त्यांच्या मुलांसाठी त्यांना कोणत्या प्रकारचे भविष्य हवे आहे याबद्दल बोलताना पाहून खूप छान वाटले.”
या जोडप्याने पोस्टमध्ये त्यांचे दोन फोटोही शेअर केले आहेत; ज्यामध्ये दोघे एकत्र हसताना आणि लोकांशी बोलताना दिसत आहेत. चांगल्या भविष्याची कल्पना करण्यासाठी या दोघांच्या वचनबद्धतेवरही या पोस्टमध्ये भर देण्यात आला आहे. या पोस्टमधून राजकारणात सक्रिय असणाऱ्या सुनक यांच्या वैयक्तिक आयुष्याची झलकही पाहायला मिळते. या पोस्टवर लोकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे.
ब्रिटनमध्ये ४ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याची घोषणा केल्यानंतर ऋषी सुनक यांनी ही सुंदर पोस्ट शेअर केली आहे. ही सुंदर पोस्ट केवळ सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांच्यातील मजबूत वैयक्तिक नातेसंबंधच प्रकट करीत नाही, तर पत्नी अक्षता यांचा त्यांना किती पाठिंबा आहे हेदेखील दर्शवते. सध्या सुनक आणि त्यांचा कन्झर्व्हेटिव्ह पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार प्रचार करीत आहे.