महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून एक अजब घटना समोर आली आहे. त्यात एका म्हशीने चक्क अडीच तोळ्याचे मंगळसूत्र गिळले आहे. या घटनेमुळे आता एकच खळबळ उडाली आहे. या मंगळसूत्राची किंमत सुमारे १.५ लाख रुपये आहे; मात्र दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ते मंगळसूत्र बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे गावातील सर्व लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

ही घटना महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. जिथे महिलेने आंघोळीला जाण्याआधी सोयाबीन आणि शेंगदाण्यांच्या सालांनी भरलेल्या घमेल्यात हे मंगळसूत्र ठेवले होते. आंघोळीवरून आल्यानंतर तिने ते घमेले म्हशीला खाण्यासाठी पुढ्यात ठेवले आणि ती तिच्या कामात व्यग्र झाली. यावेळी म्हशीने क्षणाचाही विलंब न लावता, घमेल्यातील मंगळसूत्रही गिळले.

काही वेळानंतर महिलेला तिचे मंगळसूत्र गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिला आठवले की, मंगळसू्त्र तिने ज्या घमेल्यात ठेवले होते, तेच घमेले तिने म्हशीपुढे खाण्यासाठी ठेवले होते. त्यानंतर महिलेने घडलेला संपूर्ण प्रकार पतीला सांगितला.

या घटनेनंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा मेटल डिटेक्टरच्या मदतीने म्हशीच्या पोटाची चाचणी केल्यावर तिच्या पोटात मंगळसू्त्र आढळून आले. त्यानंतर म्हशीवर दोन तासांची शस्त्रक्रिया करून, ते २५ ग्रॅमचे मंगळसूत्र बाहेर काढण्यात आले. शस्त्रक्रियेदरम्यान म्हशीच्या पोटावर ६० ते ६५ टाके पडले आहेत.

या घटनेनंतर आता पशुवैद्यकीय डॉक्टरांनी जनावरांना खायला देण्याआधी त्यांच्या ताटात काय दिले आहे ते नीट तपासून घ्या, असे आवाहन केले आहे.