नवीन वर्षांचे पहिले छायाकल्प चंद्रग्रहण शुक्रवार, १० जानेवारी रोजी रात्री १०.३७ मिनिटांनी दिसणार आहे. या चंद्रग्रहणाला ‘वोल्फ मून एकल्प्सि’ असे म्हणतात. यावर्षीचे हे पहिले छायाकल्प चंद्रग्रहण असून यावर्षीचे चारही चंद्रग्रहण हे छायाकल्प चंद्रग्रहण असतील. विदर्भात ग्रहणाची सुरुवात रात्री १०.३७ मिनिटांनी होईल. ग्रहण मध्य १२.४० मिनिटांनी तर ग्रहण समाप्ती २.४२ मिनिटांनी होईल.

कसे पाहाल चंद्रग्रहण –
चंद्रग्रहण हे सूर्यग्रहणाप्रमाणे डोळ्य़ांना हानीकारक नसते. या वेळी पौर्णिमा असूनही ग्रहणात चंद्रबिंब कमी तेजस्वी होणार असल्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. पण, ग्रहण साध्या डोळ्याने फारसे चांगले दिसणार नाही. परंतु मोठी द्विनेत्री अर्थात दुर्बिणी किंवा किंवा टेलिस्कोपने पृथ्वीची सावली पाहता येऊ शकेल. शुक्रवारी चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने चंद्रबिंब तेजस्वी आणि २.६ टक्के मोठे दिसेल. चंद्र जेव्हा पृथ्वीच्या गडद छायेतून जातो. तेव्हा खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण घडते, पण छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून जातो. त्यामुळे चंद्रावर गडद सावली दिसत नाही.

शुक्रवारी पौष पौर्णिमा
आज, शुक्रवारी पौष पौर्णिमा असून ही शाकंभरी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या रात्री हे चंद्रग्रहण बघण्याचा अनोखा योग जुळून आलाय.

मांद्य चंद्रग्रहण –
जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णत वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. एरवी पृथ्वीची गडद छाया चंद्रावर पडत असल्याने ते खग्रास किंवा खंडग्रास ग्रहण असते. पण, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून प्रवास करतो तेव्हा त्या ग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. या चंद्रग्रहणाला मांद्य चंद्रग्रहण असेही एक नाव आहे

कुठे दिसणार चंद्रग्रहण?
विशेष म्हणजे यावेळी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या लपाछपीचा खेळ देशाच्या बऱ्याचशा भागात पहायला मिळेल. हे ग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, पूर्व साऊथ आफ्रिका येथेही दिसेल.