IndiGo Flight Video: मुंबईहून वाराणसीकडे जाणाऱ्या ‘इंडिगो’च्या विमानात बसलेले प्रवासी शांतपणे प्रवासाला सुरुवात करणार, इतक्यात काहीसं विचित्र घडायला लागतं… विमानाच्या इंजिनातून येणारे आवाज, टेकऑफला होणाऱ्या उशिरामुळे प्रवाशांची ताणलेली प्रतीक्षा आणि अचानक चिडलेल्या प्रवाशांचा गोंधळ. एक क्षण असा येतो की, एअर होस्टेस स्वतः हात जोडून विनवणी करू लागते, तर पायलट कॉकपिटमधून बाहेर येते आणि थेट प्रवाशांशी संवाद साधते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या थरारक व्हिडीओमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. काय होतं त्या रात्री इंडिगोच्या 6E 5028 फ्लाइटमध्ये? वाचा, सविस्तर…
मुंबईहून वाराणसीकडे जाणाऱ्या ‘इंडिगो’च्या फ्लाइटमध्ये रविवारी रात्री थरारक प्रसंग घडला. विमानात बसलेल्या प्रवाशांना तब्बल दोन तास टेकऑफसाठी प्रतीक्षा करावी लागली. तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या उशिरामुळे प्रवासी संतप्त झाले. या सगळ्या गोंधळाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये दिसतं की, काही प्रवासी वैतागून विमानाच्या केबिन क्रूला प्रश्न विचारू लागतात. तेव्हा एक एअर होस्टेस हात जोडून प्रवाशाला जागेवर बसण्याची विनंती करताना दिसते. तिच्या या कृतीनंतर काही प्रवासी चिडचिड करीत म्हणतात, “आमचं प्राणमूल्य काही नाही का? तुम्ही चाचण्या आमच्यासमोरच का करता?”
ही घटना AI 171 अपघाताच्या पार्श्वभूमीवर झाली असून, गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या या भीषण दुर्घटनेत २६० लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती आणि अस्वस्थता वाढली आहे. त्याशिवाय कोविडनंतर विमान भाड्यांमध्ये झालेली प्रचंड वाढ आणि सुरक्षेची चिंता यांमुळेही प्रवासी अधिक संवेदनशील झाले आहेत.
मुंबई-वाराणसी फ्लाइट क्रमांक 6E 5028 ला रात्री ७.४५ वाजता उड्डाण करायचे होते. मात्र, तांत्रिक तपासणीमुळे हे विमान तब्बल ९.५३ वाजता टेकऑफ झाले आणि ११.४० ला वाराणसीला पोहोचले. या दरम्यान, विमानाच्या आत असलेल्या प्रवाशांनी आपापले फोन बाहेर काढून व्हिडीओ शूटिंग सुरू केलं. तेव्हा एअर होस्टेस त्यांना सांगते, “सर, व्हिडीओ घेणं परवानगीशिवाय बेकायदर आहे.” त्यावर एक प्रवासी भडकून म्हणतो, “एक तासापासून विमान उडत नाही, आवाज येतोय आणि तुम्ही म्हणता व्हिडीओ घेऊ नका? आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा?”
थोड्याच वेळात विमानाच्या महिला पायलट कॅप्टन उर्वशी प्रवाशांशी संवाद साधतात. त्या म्हणतात, “सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत, टेकऑफला १० मिनिटांत सुरुवात होईल. कृपया गोंधळ करू नका, मला तुमचा विश्वास हवा आहे. जर काही धोका असता, तर मी स्वतः हे विमान उडवले नसते. आपण सर्व जण सुखरूप वाराणसीला पोहोचू.”
पायलटचं हे आश्वासन ऐकून काही प्रवासी “हर हर महादेव”चा जयघोष करतात आणि पायलटही त्यात सामील होते. अखेर शांतता प्रस्थापित होते आणि विमान सुखरूप उड्डाण करते.
येथे पाहा व्हिडीओ
ही घटना इंडिगो व्यवस्थापनासाठी एक मोठा धडा ठरू शकते. कारण- प्रवाशांच्या भावनांशी खेळल्यास विश्वास गमावण्याची वेळ येऊ शकते. सध्या या प्रकाराची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.