एका मराठमोळ्या शेफच्या एका कलाकृतीची आता गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने दखल घेतली आहे. ‘मार्गराईन’ पासून तयार केलेल्या एका शिल्पामुळे शेफ देवव्रत जातेगावकर यांनी गिनिज बुकमध्ये स्थान मिळवलं आहे.

फोटोमध्ये दाखवलेलं ‘त्रिमूर्ती’चं शिल्प देवव्रत जातेगावकर यांनी तयार केलेलं आहे. गेले काही दिवस मुंबई अंतर्देशीय विमानतळाच्या अरायव्हल टर्मिनसवर हे शिल्प लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आलेलं होतं. हे शिल्प वातानुकूलित काचेच्या केबिनमध्ये ठेवण्यात आले होते. मार्गराईनपासून बनवलेल जगातलं सर्वात मोठं शिल्प म्हणून या शिल्पाची नोंद करण्यात आली आहे. ते २४ फेब्रुवारी २०१७ (महाशिवरात्री)ला पूर्ण झालं. त्यानंतर ते सर्वांच्या प्रदर्शनासाठी एक महिना ठेवण्यात आले होते.
तब्बल १५०६.८०० किलो वजनाचे हे शिल्प साडे आठ फुट लांबीचे व साडे सहा फूट उंचीचे आहे. अवघ्या १० दिवसांत हे भव्य शिल्प शेफ देवव्रत जातेगावकर यांनी पूर्ण केले. त्यासाठी दिवसाचे १४ तास ते व्यस्त असायचे. या शिल्पाद्वारे भारतीय संस्कृतीची महती, जागतिक पातळीवर आणखीन वाढवण्याचा मानस शेफ देवव्रत जातेगावकरांनी व्यक्त केला.

मार्गराईन (लोण्याचा पदार्थ) हा पदार्थ तेलापासून बनवतात. बेकरी उत्पादकामधे त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मार्गराईन कार्व्हिंगमध्ये शेफ देवव्रत यांनी कौशल्य विकसित करून ती आपली खासियत बनवली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या कौशल्याला राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले असून, २०१२ साली जर्मनीमध्ये झालेल्या कलिनरी ऑलिम्पिकमध्ये शेफ देवव्रत यांच्या ‘ओ सिंड्रेला’ या मार्गराईन शिल्पाने भारताला पहिलवहिले रौप्यपदक मिळवून दिले होते. सत्तर देशांतील जवळ जवळ १८०० शेफ्सनी त्यात भाग घेतला होता. महाला सकट सिंड्रेलाची संपूर्ण कथा दर्शविणारी कलाकृती देवव्रत यांनी मार्गराईनमध्ये साकारली होती.

मार्गराईनचं हे शिल्प साकारणं हे आव्हानात्मक काम असल्याचं सांगून शेफ देवव्रत जातेगावकर म्हणाले की १८-२० डिग्री सेल्सियसदरम्यान तापमान नियंत्रित केलेल्या एका खोलीमध्ये त्यांना काम कराव लागलं. मार्गराईन हा लोण्यासारखा पदार्थ असल्याने तो वितळण्याची शक्यता असते. त्यामुळे फार काळजी घ्यावी लागते. त्यातही गिनिज् बुकमध्ये नाव नोंदवायचं झालं तर त्यांच्या अनेक कडक नियमांच्या अधीन राहत देवव्रत जातेगावकर यांना आपली कला सादर करावी लागली. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या अनेक शेफ्सच्या साह्याने त्यांनी हे शिल्प तयार केलं.

त्यांच्या शिल्पकलेने त्यांचं नाव तर जगभर प्रसिध्द झालंच आहे. पण त्याचबरोबर भारतीय संस्कृती आणि मुंबईजवळच्या एलिफंटा गुंफांमधल्या लेण्या आणि भित्तिचित्रांची महतीही आणखी वाढली आहे.