Chinchpokli Chintamani aagman Date: अवघ्या एका महिन्यावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. मुंबई आणि पुण्यात अगदी जल्लोषात, मोठ्या उत्साहात बाप्पाचा सण साजरा केला जातो. मुंबईतील लालबाग, चिंचपोकळीचा भाग हा विशेष आकर्षणाचा ठरतो. दरवर्षी लाखो भक्तगण आपल्या बाप्पाच्या चरणी मस्तक ठेवण्यासाठी लांबचा प्रवास करून येतात.
यंदा २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी होणार असून मुंबईत अनेक ठिकाणी गणरायाचे पाटपूजन सोहळे पार पडले. आता सगळ्यांना आतुरता लागली आहे ती म्हणजे बाप्पाच्या आगमनाची. तरुणाईचं खास आकर्षण असणाऱ्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाची तारीख मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. लवकरच गणेश भक्तांच्या गर्दीमध्ये हा गणपती मंडपामध्ये विराजमान होणार आहे.
चिंचपोकळीचा चिंतामणी हा “आगमनाधीश” म्हणून ओळखला जातो. गणेशोत्सवापूर्वी चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा होतो. या सोहळ्याला मुंबईतूनच नव्हे, तर मुंबईबाहेरूनही हजारो गणेशभक्त उपस्थिती लावतात. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि बाप्पाच्या जयघोषात हा आगमन सोहळा लाखो भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. आगमन सोहळ्याची प्रथा या मंडळापासूनच सुरू झाली असेही म्हटले जाते.
दरवर्षी लक्षवेधी ठरणारा चिंचपोकळीच्या चिंतामणी आता लवकर सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. चिंतामणीचं प्रथम दर्शन आणि आगमन सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी या परिसरात लाखोंची गर्दी होत असते. गणेशभक्त वर्षभर आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत असतात, अशातच चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याची तारीख मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. १७ ऑगस्ट २०२५ रोजी रविवारी हा आगमन सोहळा पार पडणार आहे.
चिंतामणी मंडळाने दिली माहिती (Chinchpoklicha Chintamani Aagman 2025)
चिंचपोकळीचा चिंतामणी या मंडळाकडून सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यात आगमन सोहळ्याची माहिती दिली आहे. “द्या बत्ती तोफांना आगमनाचा दिवस ठरला रं… १७ ऑगस्ट रविवार २०२५ आगमन सोहळा”, अशी कॅप्शन या पोस्टमध्ये लिहित मंडळाने माहिती दिली आहे.
चिंचपोकळीच्या चिंतामणीची स्थापना आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदान (Chinchpokali Chintamani History)
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना ६ सप्टेंबर १९२० रोजी झाली. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी देशात ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याची लाट उसळली होती आणि समाजप्रबोधन व लोकशिक्षण हेच मुख्य ध्येय होते. गिरणी कामगारांची वस्ती असलेल्या लालबाग आणि परळ परिसरात अनेक तरुण या चळवळीत सक्रिय होते. याच तरुणांच्या एका गटाने, केवळ चार आणे वर्गणी गोळा करून हा उत्सव सुरू केला.
मंडळाच्या पहिल्या श्री मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ‘डेक्कन कोर’ च्या जागेत झाली. त्यानंतर जवळपास १९ वर्षांनी मंडळाला चिंचपोकळी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूला रेल्वे हद्दीच्या भिंतीजवळ नवी जागा मिळाली. तेव्हापासून याच जागेत गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे.
सामाजिक बांधिलकी आणि बदललेले नाव
केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता वर्षभर सामाजिक कार्य करावे या उद्देशाने मंडळाने पाऊल उचलले. १९५६ साली मंडळाची घटना तयार करण्यात आली आणि त्यावेळी ‘चिंचपोकळी गणेशोत्सव’ हे नाव बदलून ‘चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ’ असे नामकरण करण्यात आले. यातून मंडळाची सामाजिक बांधिलकी दिसून येते. मंडळाने रक्तदान शिबिरे, मदत कार्य (उदा. पूरपरिस्थितीमध्ये) अशा अनेक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला आहे.
चिंचपोकळीच्या चिंतामणीने अनेक महत्त्वपूर्ण उत्सव साजरे केले आहेत
- रौप्यमहोत्सव: १९४४ साली
- सुवर्ण महोत्सव: १९६८-६९ साली
- हिरक महोत्सव: १९७९-८० साली
- अमृतमहोत्सव (७५ वे वर्ष): १९९४-९५ साली
मूर्ती आणि वैशिष्ट्ये (Chinchpokli Chintamani 2025 Murti)
चिंचपोकळीच्या चिंतामणीची मूर्ती दरवर्षी विविध संकल्पनांवर आधारित असते आणि ती अत्यंत आकर्षक व देखणी असते. ही मूर्ती हजारो भक्तांना आकर्षित करते. भव्यता आणि समृद्ध परंपरांसाठी चिंचपोकळीचा चिंतामणी प्रसिद्ध आहे.