सोशल मीडियाची व्याप्ती इतकी आहे की आजकाल प्रसिद्धीसाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणून सोशल मीडियाचा वापर करतात, पण प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात सोशल मीडियाचा शॉर्टकट एका विक्रेत्याला इतका भोवला की दोन आठवडे रुग्णालयात भरती होण्याची वेळ त्याच्यावर आली.
चीनमधल्या एका मांसाहारी पदार्थ विक्रेत्याने उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी ग्राहकांना मिरच्या टाकलेले तेल पिऊन दाखले. तिखट मिरच्या घातलेले तेल पित असतानाचा व्हिडिओ त्याने फेसबुकवर लाईव्ह केला. असे केल्यामुळे आपल्या दुकानाची, उत्पादनाची आणि त्याचबरोबर आपलीही प्रसिद्ध होईल या हव्यासाने त्याने मिरच्या घातलेले तेल पिऊन दाखवले. खरे तर आपली प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्याने योग्य तेच माध्यम निवडले होते. त्यामुळे अगदी अल्पावधीत हा विक्रेता सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आला.
चीनमधल्या नेजिआँग शहरात या तरुणाचे मांसाहारी पदार्थांचे दुकान आहे. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्याने मिरची घातलेले तेल पिण्याचा स्टंट केला. सुरूवातीला मोठ्या चमच्याने त्याने तेल प्राशन केले नंतर मात्र ग्लास भरुन तिखट तेल घेतले. त्याच्या या स्टंटमुळे तो सोशल मीडियावर प्रसिद्ध तर झालाच पण अविचारीपणे मोठ्या प्रमाणात तिखट तेल प्राशन केल्यामुळे त्याला दोन आठवडे रुग्णालयात भरती व्हावे लागले. चीनमधल्या सीसीटीव्ही न्यूज चॅनेलने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.