रेडिट या सोशळ मीडिया साईटवर प्रोफेशनल्स आपली मते मांडत असतात. इतर सोशल मीडियाच्या तुलनेत यावर थोडी अधिक गंभीर किंवा सखोल चर्चा होताना दिसते. या प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टवर बरीच चर्चा होत आहे. विदेशातून परत आपल्या मायभूमीत येऊन काम करण्याची इच्छा ठेवणाऱ्या प्रोफेशनल्सच्या आशा धुळीस मिळवणारी ही पोस्ट सध्या वादात अडकली आहे. अनेकांनी या पोस्टशी सहमती दर्शवली तर काहींनी त्याचा प्रतिवाद केला.

पोस्ट काय आहे?

एका युजरने त्याच्या पत्नीच्या चुलत भावाचा प्रसंग या पोस्टमध्ये उद्धृत केला आहे. अनेक वर्ष विदेशात काम केल्यानंतर हा तरूण भारतात परतला. पण इथे आल्यावर त्याला जाणवले की, इथली पूर्ण व्यवस्थाच तुमच्या विरोधात असते.

१५ वर्ष अमेरिका आणि स्वित्झर्लंडमध्ये काम करणारा सदर तरूण FAANG कंपन्यात वरिष्ठ पदावर काम करत होता. फांग म्हणजे काय तर फेसबुक, ॲपल, ॲमेझॉन, नेटफ्लिक्स आणि अल्फाबेट या कंपन्यांचे आद्यक्षर म्हणजे FAANG. या कंपन्यांना एकत्रितपणे फांग असे लघुनाम सोशल मीडियावर दिले आहे.

तर १५ वर्षांनंतर हा तरूण भारतात आला. टायर वन शहरात आपल्या वृद्ध आई-वडिलांजवळ राहून त्यांची काळजी घेता घेता इथेच काहीतरी करता येईल, असं नियोजन त्यानं केलं होतं. तसंच त्याने एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामही मिळवलं, जिथं घरून काम करण्याची परवानगी होती.

पण पोस्टमध्ये सदर पोस्टकर्त्याने बायकोच्या चुलत भावाबद्दल पुढे लिहिले की, भारतात नोकरी पत्करूनही त्याला काही गोष्टी खटकत होत्या. जसे की, इथे निकोप स्पर्धा नाही. अमेरिकेत स्वच्छ मार्गाने पैसे मिळवता येतात. व्यवसाय, उद्यमशीलता किंवा नोकरी करून पैसे मिळवता येतात. तिथे मी जेव्हा घर किंवा इतर गोष्टींसाठी स्पर्धा करतो तेव्हा ती निष्पक्ष असेल याची खात्री असते.

An overlooked aspect of returning to India
byu/No-Way7911 inreturnToIndia

पण भारतात असे होत नाही. याबद्दल सांगताना या तरूणाने पुढे म्हटले, भारतात मी भ्रष्ट नोकरशाह आणि बाबू लोकांबरोबर स्पर्धा करत आहे. त्यांनी गैरमार्गाने पैसे ओरबाडून कमवले आहेत. ही एकतर्फी स्पर्धा एवढ्यापुरतीच मर्यादीत नाही. तुम्ही घर घ्या किंवा शाळेत दाखला घ्या, रस्त्यावर गाडी चालवा किंवा रस्त्यावर काहीही काम करा, ही जीवघेणी असमान स्पर्धा सगळीकडे आहे.

या तरूणाने पुढे म्हटले की, भारतातील व्यवस्थेमधील सावळा गोंधळ किंवा नोकरशाही ही अडचण आहेच. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे इथे खेळाचे नियमच वेगळे आहेत. अमेरिकेत असताना मला निष्पक्ष स्पर्धेमुळे आणखी ताकदीने काम करण्याची प्रेरणा मिळत होती. जर मी इतरांपेक्षा हुशार असेल आणि चांगलं काम करू शकलो तर मी निश्चितच जिंकू शकतो. पण भारतात तसं होत नाही. इथे तुम्ही कितीही मेहनत घ्या. खेळाचे नियम तुमच्याविरोधात असतील तर काहीही साध्य होणार नाही.

सदर पोस्ट रेडिटवर व्हायरल होत असून अनेकांनी यावर आपापली मते व्यक्त केली आहेत. काहींनी म्हटले की, भारतात फंडा स्पष्ट आहे. तुम्ही एकदाच यूपीएससी परीक्षेसाठी स्पर्धा करता. ती उत्तीर्ण झालात तर मग भारत तुमच्याच मालकीचा आहे. पोस्ट लिहिणाऱ्याच्या बायकोचा चुलत भाऊ मूर्ख आहे, त्याला एवढी साधी गोष्ट समजायला एवढा वेळ लागला.

दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, भारतात तुम्ही अत्यंत गरीब असाल किंवा अतिशय श्रीमंत आणि राजकीय लागेबंधे असलेले व्यक्ती असाल तरच तुमचा निभाव लागेल. कारण मधल्या फळीतले असाल तर तुम्हाला लवकरच पश्चाताप होईल.