करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच पोलीस, समाजसेवक यांच्यासोबतीने अत्यावश्यक सेवा पुरवाणारे अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता अनेकजण दिवस रात्र काम करुन करोनाच्या या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशभरामध्ये लॉकडाउन सुरु असल्याने लोकं घाराबाहेर पडणार नाहीत यासंदर्भात काळजी घेण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. पोलीसही या लढाईमध्ये पहिल्या फळीतील योद्धे म्हणून दिवस रात्र झटताना दिसत आहेत. याच पोलिसांवर हल्ले झाल्याच्याही काही घटना समोर आल्या आहेत. असं असलं तरी पोलिसांचे काम सुरुच आहे. नागरिकांनी घरात थांबावे यासाठी अगदी नाकाबंदीपासून सोशल नेटवर्किंगपर्यंत पोलीस सर्वच माध्यमातून प्रयत्न करत आहेत.

लोकांनी लॉकडाउनचे नियम पाळावेत, सोशल डिस्टन्सींगचा अवलंब करावा यासाठी पोलीस झटताना दिसत आहे. याच सर्व प्रार्श्वभूमीवर अरुणाचल प्रदेशचे पोलीस उप महानिरीक्षक मधूर वर्मा यांनी पोस्ट केलेला एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पोलीस किती जीव ओतून आपले कर्तव्य पार पडत आहेत याची झकल पहायला मिळत आहेत.

वर्मा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दोन पोलीस हवालदार जमिनीवरच झोपल्याचे दिसत आहेत. एका दुचाकीच्या बाजूला हे पोलीस झोपल्याचे फोटोमधून स्पष्ट होत आहे. “चांगला बेड आणि आठ तासाची झोप ही काय चैनीच्या गोष्टी आहेत का? हो आहेत जर तुम्ही पोलीस असाल तर… अभिमान आहे मला यांचा”, या कॅप्शनसहीत वर्मा यांनी हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी करोना योद्धे हा हॅशटॅगही वापरला आहे.

३० तासांच्या आत हा फोटो नऊ हजारहून अधिक जणांनी शेअऱ केला आहे. ११०० लोकांनी या फोटोवर प्रितिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या पोलिसांच्या कामाचे आणि त्यांच्या निष्ठेचे कौतुक केलं आहे. तर काहींनी या पोलिसांना करोनासारख्या लढाईमध्ये अधिक सुरक्षित राहण्यासाठी पुरेश्या सोयी देणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.