Tiger shocking video: वाघ हा वन अन्नसाखळीतील सर्वात बलवान आणि चपळ शिकारी म्हणून ओळखला जातो. भारतात वाघांशी संबंधित अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होतात. कधीकधी ते औषधी वनस्पतींच्या शोधात फिरताना दिसतात, कधी शिकार करताना तर कधी रहदारीच्या रस्त्यावरही दिसतात.

तथापि, वाघावर दुसऱ्या प्राण्याने हल्ला करणे दुर्मीळ आहे. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मगर नदीकाठी बसलेल्या वाघावर झडप घालते आणि काही सेकंदातच परिस्थिती उलट होते. या घटनेने नेटकऱ्यांमध्ये आश्चर्य, धक्का आणि चर्चा असा तिन्हींचा भडका उडाला आहे.

हा व्हिडीओ एका नदीच्या काठावर घडलेल्या प्रसंगावर आधारित आहे. वाघ सहसा नदीजवळ विश्रांती घेताना किंवा थंड होताना दिसतात. दुसरीकडे, मगर हे खूप शक्तिशाली भक्षक म्हणून ओळखले जातात, जे नदीकाठाजवळ लपतात आणि अचानक पाण्यातून बाहेर येतात. हे दोन शक्तिशाली वन्य प्राणी एकमेकांना भिडताना पाहणे दुर्मीळ आहे. पण, या व्हिडीओमध्ये आपल्याला ही अनपेक्षित टक्कर दिसते आणि म्हणूनच हा व्हिडीओ इतका लोकप्रिय झाला आहे.

व्हिडीओमध्ये एक वाघ नदीच्या काठावर शांतपणे उभा असलेला, उन्हात तळपताना दिसत आहे. आजूबाजूला कुठेही धोक्याचे चिन्ह दिसत नाही. काही सेकंदांनंतर, एक मगर पाण्यातून हळूहळू वाघाकडे जाताना दिसत आहे. वाघाला मात्र त्याची चाहूलदेखील लागत नाही. क्षणात मगर प्रचंड वेगाने पाण्याबाहेर येते आणि वाघाच्या पायाला धरून ठेवते.

हल्ला इतका क्षणार्धात होतो की वाघाला सुटण्याची संधी मिळतच नाही. काही क्षणात मगर त्याला पाण्याखाली खेचते आणि अखेर वाघाचा श्वास गुदमरून जातो. या दरम्यान नदीच्या पलीकडील काठावर काही लोक उभे राहून संपूर्ण प्रसंग पाहताना दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि धक्का स्पष्ट दिसतो.

पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ ‘aapkarajasthan’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मागील आठवड्यात शेअर झाला असून सध्या त्याला ७० लाखांहून अधिक व्ह्युज आणि ५० हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. मात्र, नेटकऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या दृश्याला “निसर्गाचा कठोर नियम”, “जंगलात प्रत्येक क्षण अनिश्चित असतो” अशा प्रतिक्रिया दिल्या.

तर काहींनी व्हिडीओ खरा आहे का यावरच प्रश्नचिन्ह उभे केले. अनेकांनी हा “AI जनरेटेड व्हिडीओ” असल्याचा दावा केला आहे. काहींनी तर याला CGI इफेक्ट्स असल्याचेही सांगितले आहे. मात्र, व्हिडीओची सत्यता अधिकृतरीत्या तपासलेली नसल्याचे अकाउंटनी स्पष्ट केले आहे.