Crocodile Bike Rescue Video: अनेक गाव-खेड्यांत मुसळधार पावसाने नदी-ओढ्यांमधील पाण्याची पातळी वाढल्याने अनेक जलचर प्राणी बाहेर पडताना दिसतायत. त्यामुळे मगर, साप असे काही जलचर प्राणी मानवी वस्तीत शिरत आहेत. त्यात अनेक गावांमध्ये नदी-ओढ्यांमधील पाण्याची पातळी वाढल्याने मगरीची दहशत पाहायला मिळतेय. सध्या अशाच प्रकारे मानवी वस्तीत वाहून आलेल्या एका मगरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात काही तरुण मगरीबरोबर असं काही संतापजनक कृत्य करतात की, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. गावातील तरुण मगरीला नदीत सोडण्यासाठी चक्क बाईकवरून घेऊन जातायत.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, गावात शिरलेल्या मगरीला काही तरुणांनी आधी दोरीने घट्ट बांधले, यावेळी ती हल्ला करू नये म्हणून तिचे तोंडही दोरीने बांधण्यात आले. त्यानंतर मगरीला बाईकवर ठेवण्यात आले. बाईक चालवणारा एक जण त्यामागे मगर आणि आणखी दोघे जण मागे असे एकूण तिघे जण मगरीला बाईकवर बसवून नदीत सोडण्यासाठी निघाले. अतिशय धोकादायक पद्धतीने मगरीला नेले जात आहे.

यावेळी तिथे उपस्थित असलेले लोक त्या तरुणांना सतत मगरीला उलटं करून बसवण्याचा सल्ला देतात; पण ते तरुण कोणाचंही ऐकत नाहीत. दरम्यान, या व्हिडीओवर आता लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

मगरीच्या सुटकेचा हा व्हिडीओ @SachinGuptaUP नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात, पुरात वाहून आलेली एक मगर गावात शिरली. तरुणांनी तिला पकडले. तिचे तोंड बांधून बाईकवर बसवले आणि नदीत सोडले.’

या व्हिडीओच्या सेक्शनमध्ये युजर्स तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले- हे खूप धोकादायक लोक आहेत, मगरीलाही प्रश्न पडला असेल की, तो कोणत्या देशात अडकला आहे. दुसऱ्याने म्हटले की, हे फक्त यूपीमध्येच शक्य आहे. तुम्ही यूपीमध्ये राहत असाल. काहींनी मगरीबरोबर असं वागणं फार चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.