Did Muslims Slaughter Cow For Rahul Gandhi Rally: लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा सहावा टप्पा देशभरात चालू असताना एक अत्यंत भीषण व्हिडीओ तितक्याच गंभीर दाव्यासह सोशल मीडियावर शेअर होत आहे. यामध्ये एका जीपवर रक्तबंबाळ गायीच्या मृतदेह घेऊन जात असल्याचे दिसत आहे. व्हायरल व्हिडीओसह शेअर होत असणाऱ्या पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, केरळ येथे वायनाडमध्ये राहुल गांधींनी काढलेल्या रॅलीचे स्वागत करण्यासाठी तेथील मुस्लिमांनी गाय कापली होती. नेमकं हे प्रकरण काय व त्यात कितपत तथ्य आहे याचा फॅक्ट क्रेसंडोने घेतलेला हा आढावा नक्की वाचा..

काय होत आहे व्हायरल?

व्हायरल व्हिडीओमध्ये चार चाकी वाहनावर ठेवलेल्या गायीचे शव दिसतेय. पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, राहुल गांधींनी केरळच्या वायनाडमध्ये काढलेल्या रॅलीचे स्वागत करण्यासाठी तेथील मुस्लिमांनी ही गाय कापली होती. युजर्स हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “काँग्रेसला मत देणाऱ्या हिंदूंनी बघा”

व्हिडीओ अत्यंत भीषण असल्याने इथे दाखवलेला नाही, संदर्भासाठी फोटो पाहू शकता..

राहुल गांधीच्या रॅलीच्या स्वागतासाठी गायीची हत्या? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

तपास:

सर्व प्रथम राहुल गांधींनी केरळमधील वायनाड जिल्ह्यात काढलेल्या रॅलीमध्ये त्यांचे स्वागत करण्यासाठी मुस्लिमांनी गाय कापली, अशी कोणतीही बातमी माध्यमांमध्ये आढळत नाही. रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर @wayanadview नावाच्या इन्स्टाग्राम युजर्सने हाच व्हिडीओ १७ फेब्रुवारी रोजी शेअर केला होता असे आमच्या लक्षात आले. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “जेव्हा पुलपल्लीत लोकांनी कायदा हातात घेतला.”

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, एशियानेटच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर १७ फेब्रुवारी रोजी एका लाईव्ह व्हिडीओ अपलोड केला होता. ज्यामध्ये संतप्त लोकांनी मृत गाय वनविभागाच्या अधिकाऱ्याच्या जीपवर बांधल्याचे वृत्त देण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी सुद्धा वेगवेगळ्या दाव्यांसह हा व्हिडीओ शेअर केला जात होता .

न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार केरळमध्ये वायनाड जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याने गाईचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने त्याच गाईचे शव वन विभागाच्या जीपला बांधले होते. फ्री प्रेस जर्नल आणि द हिंदूस्तान टाईम्सच्या बातमीनुसार जंगलात झालेल्या हल्ल्यात वनविभागाचे पर्यवेक्षक व्ही.पी.पॉल यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या निषेधार्थ शेकडो लोक पुलापल्ली शहरातील रस्त्यावर उतरले होते.

https://www.freepressjournal.in/india/video-angry-mob-ties-dead-cow-over-forest-department-jeep-in-protest-against-wild-animal-attacks-in-keralas-wayanad
https://www.hindustantimes.com/india-news/protests-erupt-in-kerala-s-wayanad-over-man-animal-conflicts-101708197951567.html

जिल्ह्य़ात सुरू असलेल्या मानवी – वन्यजीवामधील संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करत लोकांनी ही संतप्त आंदोलन केले होते. यादरम्यान संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. जमावाने वनविभागाची जीप अडवून तिचे नुकसान केले आणि वाघाने मारलेल्या गायीचा मृतदेह आणून जीपवर बांधल्याने तणाव आणखी वाढला होता.

निष्कर्ष: यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडीओ राहुल गांधीशी संबंधित नाही. केरळमध्ये वायनाड जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याने गाईचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने वनविभागाच्या जीपवर गायीचा मृतदेह बांधला होता. खोट्या दाव्यासह हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हे ही वाचा<< IFS अधिकाऱ्याच्या बायकोचा विनयभंग, भाजपा नेत्याला महिलेची चप्पलेने मारहाण? Video कधीचा, नेमकं घडलं काय?

अनुवाद- अंकिता देशकर

(ही कथा मूळतः फॅक्ट क्रेसेंडो ने प्रकाशित केली होती आणि शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून लोकसत्ता पुनर्प्रकाशित केली आहे.)