माणसावर प्राणघातक हल्ला करणा-या धोकादायक माशांमध्ये शार्क मासाही येतो. अनेकदा या माशाच्या हल्ल्यामुळे अनेक खलाशी जखमी किंवा मृत झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. शार्कच्या प्राणघातक हल्ल्याचा असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
युट्युबवरच्या Gabe and Garrett या प्रसिद्ध चॅनेलने हा व्हिडिओ टाकला आहे. बोटीच्या शेजारी असलेल्या लोखंडी पिंज-यात एक स्कूबा ड्रायव्हर आहे. तर या पिंज-याच्या एका टोकाला शार्क माशाला आकर्षित करण्यासाठी मांसाचा एक तुकडा अडकवलेला आहे. काहीच वेळात समुद्रातून वेगाने शार्क येतो आणि लोखंडी पिंजरा तोडून पिंज-यात शिरतो. शार्कने अनपेक्षितरित्या केलेला हा प्राणघातक हल्ला पाहून सगळ्यांच्याच काळजाचे ठोके चुकतात आणि या पिंज-यात असलेल्या स्कूबा ड्रायव्हरला वाचवण्यासाठी त्याच्या मदतनीसांचा आटापीटा सुरु होतो. शार्कच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला की आणखी काही घडले हे कोणालाच समजत नाही. पण कोणतीही दुर्घटना घडू नये हीच सगळे प्रार्थना करतात. अशातच बोटीवरचा दुसरा माणूस प्रसंगावधानता दाखवून पिंज-याची वरची बाजू उघडतो आणि जखमी झालेला शार्क बाहेर पडून पुन्हा समुद्रात निघून जातो. पण स्कूबा ड्रायव्हराचा मात्र काहीच पत्ता लागत नाही त्यामुळे बोटीवरचे सगळेच जीव भांड्यात टाकून पिंज-याकडे आशेने पाहतात. काही वेळाने मात्र स्कूबा ड्रायव्हर अत्यंत शांतपणे पिंज-यातून बाहेर येतो. त्याला सुखरूप बाहेर येताना पाहून सगळेच आनंदाने टाळ्या वाजवतात.
शार्क हल्ल्याचा हा थरार इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. सगळेच या स्कूबा ड्रायव्हरचे कौतुक करत आहे. शार्कच्या हल्ल्यातून वाचलेला हा स्कूबा ड्रायव्हर सगळ्यात अनुभवी असल्याचे समजते आहे.