ग्राहक हा राजा असतो असं म्हटलं जातं. मात्र याच ग्राहकाचा संताप अनावर झाल्यास तो आपला संताप अशा काही भलत्याच पद्धतीने व्यक्त करु शकतो की ज्यामुळे एकाद्या कंपनीचं नाव खराब होऊ शकतं. असाच काहीसा प्रकार काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये पहायला मिळाला. येथील एका श्रीमंत व्यक्तीने फोर्ड या कार कंपनीने त्याच्या लाखो रुपयांच्या गडीमधील समस्येकडे लक्ष द्यावं म्हणून चक्क गाढावाच्या मदतीने आपली अलीशान गाडी खेचत सर्व्हिस सेंटरला नेली.

हा सर्व प्रकार जयपुरमध्ये घडला असून या आगळ्यावेगळ्या निषेधाचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे. अर्जून मीणा नावाच्या व्यक्तीने फोर्ड कंपनीची २०२० फोर्ड एन्डेव्हर ही महागडी गाडी विकत घेतली होती. या गाडीची भारतातील किमान किंमत ही ३३ लाख ८१ हजार इतकी आहे. मात्र एवढा पैसा खर्च करुनही गाडीत अनेक समस्या होत्या आणि अनेकदा तक्रार केल्यानंतर याकडे गाडीचे डिलर लक्ष देत नसल्याने आपली समस्या जगासमोर यावी म्हणून अर्जून मीणा यांनी बॅण्डबाजासहीत गाढवाकडून गाडी ओढून घेत ती डिलरकडे नेली. यापूर्वीही मीणा यांनी २०१६ मध्ये एन्डेव्हर विकत घेतली होती तेव्हाही अनेक समस्या आल्याचं त्यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी २०२० साली याच गाडीचं नवीन मॉडेल विकत घेतलं. मात्र त्यामध्येही गेअर ट्रान्समिशनची अडचण येऊ लगाली.

मीणा यांनी केलेल्या दाव्यानुसार गाडी खरेदी केल्यापासून ती त्यांच्या घरापेक्षा अधिक वेळ सर्व्हिस सेंटरमध्ये आहे. ही गाडी चालवताना अचानक रस्त्याच्या मध्येच थांबते अशी मालकाची तक्रार आहे. गाडीच्या ट्रान्समिशनमध्ये अडचण असल्याने गेअर अडकतात आणि गाडी मध्येच थांबते. याबद्दल अनेकदा गाडी सर्व्हिसिंगला देऊनही समस्या सुटलेली नाही म्हणून मीणा यांनी हा अनोखा निशेष केल्याचं कारटॉप डॉटकॉमने म्हटलं आहे. इतकच नाही आता काही दिवस मीणा अशाप्रकारे सतत आंदोलन करत राहणार असून तरीही समस्या सुटली नाही तर आपण डिलरच्या दुकानासमोरच गाडी पेटवून देऊ असंही मीना यांनी म्हटलंय. फोर्डने यासंदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

अशाप्रकारे गाढवाच्या मदतीने गाडी खेचत डिलरकडे नेण्याचा हा भारतातील काही पहिलाच प्रकार नाही. पूर्वी एमजी, स्कोडा, जॅग्वार, टोयोटा लॅण्ड क्रुझरसारख्या महागड्या गाड्यांच्या मालकांनी कंपनीच्या गाड्यांबद्दलच्या तक्रारीकडे लक्ष वेधण्यासाठी असे प्रकार केल्याची उदाहरणे आहेत.