धंदा लहान असो किंवा मोठा; अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करणे सोपे काम नाही. त्यासाठी विक्रेत्यांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे बाजारात अनेक प्रकारची उत्पादने असूनही अनोख्या शैलीत मार्केटिंग करणारे प्रसिद्ध होतात. पण, अनेक छोट्या विक्रेत्यांना जाहिरात किंवा मार्केटिंगवर तितका पैसा खर्च करणे परवडत नाही. अशा वेळी ते काही ना काही अनोखी युक्ती किंवा जुगाड शोधून काढत आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवत असतात. अशाच प्रकारे एका ड्रायफ्रूट्स विक्रेत्याने आपली उत्पादने विकण्यासाठी एक अनोखी पद्धत वापरली आहे. या काकांनी ड्रायफ्रूट्स विकण्यासाठी एक हटके गाणे तयार केले आहे; जे ऐकल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणे अवघड होईल.
सोशल मीडियावर अनेक विक्रेते त्यांच्या गाण्यामुळे; तर काही वेळा विकण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीमुळे प्रसिद्ध होतात. यात तुम्हाला काही महिन्यांपूर्वी व्हायरल झालेल्या कच्च्या बदामवाल्या काकांची आठवण झालीच असेल, तशाच प्रकारे आता ड्रायफ्रूट्स विकणाऱ्या काकांची सर्वत्र चर्चा होत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ड्रायफ्रूट्स विकणारे काका स्वत: अनोख्या पद्धतीने एक गाणे गात आहेत. ‘सूरज’ चित्रपटातील ‘बहारों फूल बरसाओ’ या गाण्याची चाल वापरून त्यांनी ड्रायफ्रूट्स विकण्यासाठी एक हटके गाणे स्वत: तयार केले आहे. आओ खजूर खाओ, सऊदी का ये मेवा है। चले आओ खजूर खाओ, खजूर का ये ठेला है। खजूर खाएं, ताकत बढ़ाएं।, असे या गाण्याचे बोल आहेत; जे त्यांनी स्वत:च्या पद्धतीने लिहिले आहेत.
हटके पद्धतीने गाणे गात ड्रायफ्रूट्स विकणाऱ्या या काकांचा व्हिडीओ bhopal_ki_baatein) नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या काही मिनिटांचा हा व्हिडीओ आता युजर्सना चांगलाच पसंतीस पडला आहे. त्यामुळे युजर्सनी त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले- माझ्या मते तुम्ही मुंबईला येऊ शकता. दुसऱ्या युजरने लिहिले की, आग लावून टाकली! तर अन्य एका युजरने लिहिले की, भोपाळमध्ये टॅलेंटची कमतरता नाही.