Himachal Nurse Viral Video : दररोजच्या धावपळीच्या जगात आपण अनेकदा ‘कर्तव्य’ हा शब्द ऐकतो, वापरतो, पण खरं तर त्याचा अर्थ किती खोल आहे याचा विचार करतो का? कर्तव्य म्हणजे फक्त काम पूर्ण करणं नव्हे, तर जबाबदारीची जाण ठेवून ती निस्वार्थपणे ते काम पार पाडणं. सैनिक सीमारेषेवर जीव धोक्यात घालून देशाचे रक्षण करतात, शेतकरी शेतात धान्य पिकवून साऱ्या जगाला पोसतो, आई वडील निस्वार्थपणे आपल्या लेकरांची काळजी घेतात…..हीच खरी कर्तव्याची ताकद आहे. कर्तव्य म्हणजे आत्मत्याग, समर्पण आणि धैर्य यांचा संगम आहे. समाजातील प्रत्येक नातं आणि प्रत्येक भूमिकेचं मोल कर्तव्यामुळेच टिकून राहतं. आजही कित्येक लोक समाजाप्रती आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावतात. अशाच एक कर्तव्यदक्ष नर्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक नर्स तिचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी उफाळत्या पाण्याच्या प्रवाह ओलांडताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओ हिमाचल प्रदेशातील मंडी येथील पूरग्रस्त ओढ्यावरील आहे. लहान बाळांना लस मिळावी यासाठी नर्स जोरादार पाण्याच्या प्रवाह जीव धोक्यात टाकून ओलांडताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मंडी जिल्ह्यातील चौहरघाटी येथील कमला नावाच्या नर्सने कर्तव्य पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावली आहे. खवळलेले पाणी आणि तुटलेला पूल देखील तिचे कर्तव्य पूर्ण करण्यापासून रोखू शकला नाही. क्लिपमध्ये, ती खवळलेल्या पाण्याचा प्रवाह आणि निसरड्या दगडांवरून उडी मारताना दिसत आहे. खाली प्रचंड वेगाने पाण्याचा प्रवाह वाहत आहे ती जिथे तैनात आहे त्या सामुदायिक आरोग्य केंद्रात पोहोचण्याचा निर्धार करत आहे.
टिक्कर गावातील रहिवासी कमला दररोज ड्युटीवर जाण्यासाठी सुमारे चार किलोमीटर प्रवास करते. मुसळधार पावसामुळे आणि पादचारी पूल वाहून गेल्याने तिचा प्रवास आणखी खडतर झाला पण तरी तिने हार मानली नाही. “हे कठीण आहे, पण कर्तव्य प्रथम येते,” असे ती सांगत आहे. तिच्या धाडस हे कौतुकास्पद असले तरी त्या पाण्यात एक चुकीचे पाऊल टाकले तर शेवट खूप वाईट झाला असता.
व्हायरल व्हिडिओ येथे पहा:
अलिकडच्या आठवड्यात चौहार खोऱ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरपरिस्थितीमुळे पूल आणि रस्ते कोसळल्याने सिल्हबुधानी आणि तर्सवानसारख्या पंचायती संघर्ष करत आहेत. कमलासारख्या अत्यावश्यक सेवेकरिता काम करणाऱ्या कामगारांसह स्थानिक लोक आता त्यांचे जीवन जगण्यासाठी आणि कर्तव्य पूर्ण करण्यासाठी पूरग्रस्त नाले आणि ओढ्यांवरून धोकादायक मार्ग स्विकारतात.
अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की,”हिमाचल प्रदेशातील ३१३ रस्ते पावसामुळे बंद आहेत, त्यापैकी १६० रस्ते एकट्या मंडी जिल्ह्यातील आहेत. स्थानिक हवामान खात्याने येत्या काही दिवसांत एकाकी भागात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
सध्या, कमलाचा व्हिडिओ आघाडीवरील कर्मचाऱ्यांच्या धाडसाची आठवण करून देतो आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे धोकादायक परिस्थितीत लोक स्वतःचा बचाव कसा करतात हे देखील दर्शवतात.