Elephant Train Accident Video: जंगलातील जीवसृष्टीचं आयुष्य हे नेहमीच धोक्यांनी वेढलेलं असतं. जंगलात राहिलं, तर शिकारी प्राण्यांचा धोका आणि जर चुकून माणसांच्या वस्तीच्या जवळ ते आले, तर मग त्यांच्या जीवावर बेततं. दिवसेंदिवस जंगलं झपाट्यानं नष्ट होत आहेत. झाडं कापली जात आहेत, रस्ते-रेल्वेमार्गांसाठी जागा मोकळी केली जात आहे आणि म्हणूनच जंगली प्राणी आता वारंवार मानवी वस्तीत शिरताना दिसतात. पण, याच कारणामुळे त्यांच्या आयुष्याला पूर्वीपेक्षा जास्त धोका निर्माण झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो केवळ धक्कादायक नाही, तर हृदय पिळवटून टाकणारा आहे. व्हिडीओत दिसतं की एक महाकाय हत्ती रेल्वे अपघातात जखमी होतो आणि रुळांच्या कडेला जीवासाठी तडफडत पडतो. त्याचा तो असहाय संघर्ष पाहून कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईल.
भीषण दृश्य : हत्तीचा असहाय संघर्ष
हत्तींचा रेल्वेगाड्यांशी अपघात होणं ही नवीन गोष्ट नाही. कधी प्राण गमवावा लागतो, तर कधी गंभीर जखमा होतात. मात्र या व्हिडीओतला हत्ती इतक्या वाईटरीत्या जखमी झाला आहे की, उभं राहून चालायची शक्तीही त्याच्याकडे उरलेली नाही. तो उठायचा प्रयत्न करतो; पण काही पावलंही टाकू शकत नाही आणि शेवटी रुळांलगतच तो कोसळतो. हा क्षण इतका हृदयद्रावक आहे की, पाहणाऱ्याचे डोळे नकळत पाणावतात.
हा ३२ सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने पसरत आहे. @Jimmyy__02 नावाच्या युजरने एक्स (ट्विटर)वर हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिली आहे, “मानवानं जमीन बदलली, मशीन आणली… पण हत्ती बदलू शकले नाहीत आणि आता त्यांना याची शिक्षा भोगावी लागतेय.” हा व्हिडीओ जुना असून पुन्हा व्हायरल होतोय.
आतापर्यंत हा व्हिडीओ ५५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला असून, शेकडो लोकांनी लाईक आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी लिहिलं, “आपण त्यांचं रक्षण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत”, तर काहींनी म्हटलं, “मूक जीव आपल्यामुळे हे दुःख सहन करीत आहेत.” अनेकांनी ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याचं सांगून, निसर्ग आणि प्राण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली असल्याचं अधोरेखित केलं आहे.
येथे पाहा व्हिडीओ
जंगलं नाहीशी होत आहेत, रेल्वेमार्ग वाढत आहेत, आणि या बदलांचा फटका सर्वाधिक बसतो तो बिनबोलक्या, निष्पाप प्राण्यांना. हत्तीच्या या तडफडत्या अवस्थेचा व्हिडीओ पाहून एकच प्रश्न मनात उमटतो, आपण खरंच निसर्गाशी न्याय करीत आहोत का?