महिन्याकाठी मिळणाऱ्या अमूक एक वेतनाच्या रकमेसाठी प्रत्येक नोकरदार ३० दिवस राबत असतो. तेव्हा कुठे वेतनाचा दिवस उजाडतो आणि नोकरदारांना त्यांच्या गरजा भागवता येतात. ‘महिन्यातून दोनदा वेतन मिळाले तर..’, अशी कल्पना केली तरी काही क्षण मनाला आनंद मिळतो. पण चिलीमधील एका कर्मचाऱ्याला असा आनंद ३०० पटीने अधिक मिळाला आहे. त्याचे झाले असे की, त्याच्या खात्यात चुकून जवळपास ३०० महिन्यांचा पगार जमा झाला. यानंतर पठ्ठ्यानं लागलीच राजीनामा टाकून कंपनीला ‘अलवीदा’ म्हटले.

कर्मचाऱ्याच्या खात्यात चुकून ३०० पट अधिक पगार जमा झाल्याचे कंपनीला लक्षात येताच. कंपनीने त्याला पैसे परत करण्यास सांगितले. मात्र कर्मचाऱ्याने पैसे परत देण्यास नकार दिला. यानंतर कंपनीने त्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला. विशेष म्हणजे हा खटलाही सदर कर्मचाऱ्याने जिंकला. नेमकं काय घडलं, जाणून घेऊ.

सदर कर्मचारी चिलीमधील डॅन कॉन्सोर्सियो इंडस्ट्रियल इस्टेट येथे सहाय्यक पदावर काम करत होता. त्याला साधारण दरमहा ३८६ पाउंड इतके वेतन मिळत होते. मे २०२२ मध्ये त्याच्या मालकाने चुकून त्याच्या खात्यात १ लाख २७ हजार पौंड ट्रान्सफर केले, अशी बातमी मेट्रो या संकेतस्थळाने दिली आहे. (भारतीय रुपयांमध्ये १ पाउंडची किंमत सध्या ११७ रुपये, तर २०२२ मध्ये ९७ रुपये इतकी होती)

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरुवातीला कर्मचाऱ्याने हे पैसे परत करणार असल्याचे मान्य केले. मात्र नंतर तीन दिवसांनी त्याने राजीनामा दिला. यानंतर सुरू झालेला वाद न्यायालयापर्यंत पोहोचला. तब्बल तीन वर्ष हा वाद सुरू होता. या काळात सदर कर्मचाऱ्यावर चोरीचा आरोप करण्यात आला. सॅंटियागो येथील न्यायालयाने नुकताच या प्रकरणी निकाल दिला असून ही घटना चोरीची नसून अनधिकृत वसुलीची आहे, असं सांगितलं.

न्यायाधीशांनी निकाल देताना म्हटले की, पैसे वसुलीसाठी कंपनीने जे मार्ग निवडले त्यामुळे हा खटला फौजदारी गुन्हा म्हणून चालवता येणार नाही. कंपनीनेही आपली बाजू मांडली. त्यांनी म्हटले की, पैसे परत मिळविण्यासाठी ते सर्व कायदेशीर मार्गाचा अवलंब करतील.