मुलगी आणि वडील- हे नाते शब्दांत मांडणे कठीण आहे. एका वडिलांसाठी मुलगी ही त्याच्या आयुष्यातील सर्वांत कोमल आणि मौल्यवान नाते असते. तिचे पहिले पाऊल, तिचे पहिले स्मित, तिचा पहिला ‘बाबा’ – प्रत्येक क्षण त्याच्या आठवणीत कोरला जातो. आयुष्य बदलले असले तरी वडिलांचे आपल्या मुलीवरील प्रेम कधीही कमी होत नाही. हे नाते अंतराने बांधलेले नाही, तर भावनेने बांधलेले आहे. जग काहीही म्हणते की, एक वडील आपल्या मुलीच्या डोळ्यांतील आनंद पाहण्यासाठी काहीही करतील आणि हे या भावनिक व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येते.

आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात; पण काही व्हिडीओ असे असतात, जे थेट हृदयाला स्पर्श करतात. सध्या असाच एक भावनिक व्हिडीओ लोकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरतोय. घटस्फोटानंतर वेगळे राहणाऱ्या आई-वडिलांच्या वादाचा फटका सर्वांत जास्त मुलांनाच बसतो हे या व्हिडीओमध्ये प्रकर्षाने जाणवते. आपल्या लहान मुलीची फक्त एक झलक पाहण्यासाठी एका वडिलांनी केलेला प्रयत्न आणि त्या क्षणी दिसणारे प्रेम व आपुलकी लोकांना भावते.

हा व्हिडीओ वडील-मुलगी यांच्या नात्याबद्दल आहे, जिथे वडील आणि त्याची पत्नी घटस्फोट घेतात; पण वडील अजूनही आपल्या मुलीवर तितकेच प्रेम करतात. दररोज तिचे वडील तिच्या शाळेत जाणाऱ्या रस्त्यावर मोटरसायकलवरून उभे असतात, तिची फक्त एक झलक पाहण्याची वाट पाहत असतात. ते तिच्याशी बोलण्यासाठी, तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासाठी आतुर असतात. हा व्हिडीओ लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण करतो – “मतभेद मोठे की मुलांचं प्रेम?”

व्हिडीओमध्ये वडील रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे दिसत आहे आणि मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत शाळेत जात आहे. वडिलांना पाहताच ती आनंदाने उड्या मारते. तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्या क्षणातील निरागस भावना कोणालाही भावनिक करील. वडील फक्त विचारतात – “तू ठीक आहेस ना?” त्यावर ती चेहऱ्यावर मंद हास्य आणून उत्तर देते आणि ती निघून जाते; पण वडील वळून तिला वारंवार जाताना पाहतात. त्या क्षणी त्याला दिसणारे प्रेम आणि वेदना दोन्ही भावना हृदयद्रावक आहेत.

पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी लिहिलं – “मतभेदांचा परिणाम मुलांवर होतो, हे पाहून मन भरून आलं.” काहींनी तर म्हटलं – “नवरा-बायको” वेगळे झाले तरी प्रेमाचं नातं तुटत नाही, फक्त त्याचा भार मुलांवर पडतो.” काहीनी दोन्ही पालकांना जबाबदार ठरवीत लिहिलं, “आपण या जगात मुलांना आणलं आहे, तर त्यांना आपल्या मतभेदांची शिक्षा का द्यायची?”

हा व्हिडीओ @rajgarh_mamta1 या अकाऊंटवरून शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिलं आहे – ‘बाळांना मिळते ती आपल्या वादांची शिक्षा. नातं तोडण्याआधी शंभरदा विचार करा.’ हा संदेश आणि व्हिडीओ दोन्ही एकत्र येऊन एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. रागात तुटलेले संबंध मुलांच्या मनावर कायमचा ठसा उमटवतात. त्यामुळे नाती वाचवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी व्हायला हवा. हा व्हिडीओ केवळ सोशल मीडियावरचा नाही, तर आजच्या समाजात वाढत्या घटस्फोटांच्या पार्श्वभूमीवर वडील-मुलीच्या नात्याची आणि पालकांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा एक हृदयस्पर्शी संदेश आहे.