Viral video: लग्नापुर्वी अन् लग्नातही नवरीला सर्वात जास्त कोणाची भीती वाटत असेल तर ते म्हणजे सासू-सासरे. आपले सासू-सासरे कसे असतील याची धाकधुक प्रत्येक नवरीला असते. पण समजा हेच सासू सासरे प्रेमळ निघाले तर…सध्या एका सासऱ्यांनी दाखवलेल्या प्रेमाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. सोशल मीडियावर आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत,त्यामध्ये या नात्याबद्दलचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत.दरम्यान सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आई-वडील नसलेल्या सुनेसाठी सासऱ्यांनी हॅलिकॉप्टर पाठवलंय. लग्नामध्ये आपल्या सुनेला असं गिफ्ट दिलंय की सगळेच अवाक् झाले आहेत. व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल प्रत्येक मुलीला असंच सासर मिळो.
आजकाल अनेकजण अगदी साधेपणाने लग्न करण्याला पसंती देत असताना, धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मात्र आपल्या मुलाच्या लग्नात आणि विशेषतः सुनेसाठी असा काही शाही थाट केला आहे, ज्याची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. आई-वडिलांचं छत्र हरवलेल्या आपल्या सुनेला लग्नात कोणताही कमीपणा भासू नये म्हणून, सासऱ्याने चक्क तिच्यासाठी हेलिकॉप्टर पाठवून तिला सासरी आणलं आणि त्याच हेलिकॉप्टरमधून वधू-वरांची गावात मिरवणूक काढली.
भूम तालुक्यातील अंतरवली गावात ही आनंददायी आणि तितकीच चर्चेची घटना घडली आहे. येथील रहिवासी शेतकरी भास्कर शिकेतोड यांच्या लहान मुलाचं, आकाशचं, लग्न सावरगाव येथील अस्मितासोबत ठरलं होतं. अस्मिताने लहानपणीच आई-वडिलांना गमावलं असून तिचा सांभाळ तिच्या मामाने केला होता. लग्नासाठी अस्मिताला तिच्या माहेरहून, म्हणजे सावरगावहून (जे अंतरवली गावापासून अवघे दोन किलोमीटर अंतरावर आहे), सासरी आणायचं होतं. त्यांनी या प्रवासासाठी चक्क हेलिकॉप्टरचा वापर केला आणि सुनबाईला शाही थाट सासरी आणले
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ dharashiv_2.0 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. एकानं म्हंटलंय, नशीब लागत आई वडिलांसारखी प्रेम करणारे सासू सासरे भेटायला. तर आणखी एकानं, वावर है तो पावर है…. खरच आहे हे नाहीतर नोकरी करणारे साध रेल्वेत पण कुठ बाहेरगावी नेत नाहीत.