Indian Railway Viral Video : रेल्वे प्रवास हा सोपा आणि सोयीस्कर मानला जातो. कारण ट्रेनमध्ये अनेक सेवा-सुविधा असतात. तसेच आरामात झोपून प्रवास करता येतो. पण, रेल्वे प्रवासादरम्यान अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण अनेकदा तुमची एक छोटीशी चूक जीवघेणी ठरू शकते. ट्रेन प्रवासादरम्यान सिगारेट, विडी ओढणे कायदेशीर गुन्हा आहे, पण तरीही लोक या गोष्टी सर्रासपणे करताना दिसतात. तसेच असे करणाऱ्या प्रवाशांना रोकणाऱ्यांनाच शिवीगाळ केली जाते. सध्या सोशल मीडियावर असाच ट्रेनमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात धावत्या ट्रेनमध्ये पेटत्या सिगारेटमुळे दुर्घटना घडल्याचे दिसतेय.
पेटत्या सिगारेटमुळे ट्रेनमध्ये घडली मोठी दुर्घटना
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका ट्रेनमध्ये धूर झालेला दिसतोय. सिगारेटमुळे ट्रेनमधील फायर एक्स्टिंग्विशर युनिट फुटल्याचे सांगितले जाते. व्हायरल व्हिडीओतून असा दावा करण्यात आला आहे की, काही प्रवासी धावत्या ट्रेनमधील शौचालयाजवळ उभे राहून धूम्रपान करत होते, ज्यामुळे ट्रेनमधील फायर एक्स्टिंग्विशर युनिट फुटले. या दुर्घटनेत युनिटमधील केमिकल सीटजवळ पसरले. ट्रेनच्या शौचालयातून धूर येऊ लागला. इतकेच नाही तर ट्रेनचे छत फुटून त्यातून पाणी खाली टपकू लागले. या व्हिडीओतून प्रवाशांना चुकूनही ट्रेनमध्ये सिगारेट ओढू नका असे आवाहन करण्यात येत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, जो पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कारण अशाप्रकारच्या घटना सिगारेट ओढणाऱ्यांसह ट्रेनमधील इतर प्रवाशांच्याही जीवावर बेतू शकतात. यात अनेकांनी कमेंटमध्ये या घटनेस जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर अनेकांनी धावत्या ट्रेनमध्ये सर्रासपणे सिगारेट ओढणाऱ्यांविरोधात रेल्वे प्रशासनाने आता कडक शिक्षेची तरतूद करावी असे काहीजण म्हणत आहेत.