Foreigner Picking Trash At Kangra Waterfall Video : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने अनेक जण पर्यटनासाठी म्हणून घराबाहेर पडतात. यावेळी निसर्गरम्य ठिकाणी जसे की, नदी, धबधबा, गड-किल्ले, तसेच घनदाट जंगल असलेल्या परिसराला भेट देतात. येथील सुंदर देखाव्याचा आनंद घेतात; पण तिथे फिरताना मात्र स्वच्छतेची तितकी काळजी घेतली जात नाही. अनेक पर्यटक फिरायला जातात, तिथे कचरा करतात. पण, त्या ठिकाणांवर विदेशी पर्यटकही येत असतात आणि ते जेव्हा तिथला कचरा, घाण पाहतात आणि ती जगाला दाखवतात तेव्हा ते मात्र आपल्या डोळ्यात खुपतं. सध्या अशाच एका स्थितीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
काही लोकांना थोडीशीही सामाजिक शिस्त नसते. ते सुंदर धबधबे, नदीकाठावर कचरा करून मोकळे होतात. तर ते स्वच्छ करण्यास सांगितले, तर चवताळतात किंवा कारणं देऊ लागतात. पण याच लोकांमुळे भारतातील पर्यटनस्थळं अस्वच्छ, घाणेरडी, बकाल दिसतात. पण, व्हायरल व्हिडीओत एका विदेशी पर्यटकानं कौतुकास्पद कृत्य करीत भारतीय पर्यटकांना, नैसर्गिक ठिकाणी कचरा पसरवणं किती लाजिरवाणी बाब आहे, याची जाणीव करून दिली आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील एका धबधब्यावरील हा व्हिडीओ आहे.
ज्या ठिकाणी एक परदेशी पर्यटक धबधब्याजवळ पसरलेले प्लास्टिक रॅपर आणि कचरा उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकतान दिसतोय. भारतीय पर्यटकांनी केलेला कचरा परदेशी पर्यटक उचलतोय. त्यामुळे सोशल मीडियावर सर्व जण त्याचे कौतुक करतायत. बरेच लोक म्हणत आहेत की, हे काम इथल्या लोकांनी स्वतः केलं पाहिजे; पण एक परदेशी व्यक्ती ते करीत आहे.
व्हिडीओमध्ये पर्यटक असे म्हणताना ऐकू येतेय की, मी दररोज इथे बसून लोकांना कचरा उचलण्यास आणि स्वच्छता ठेवण्यास सांगतो.
हा व्हिडीओ @iNikhilsaini नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरने शेअर केला आहे. जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर कमेंट्स केल्या. एकाने लिहिले, “एक परदेशी पर्यटक तिथे स्वच्छता करतोय आणि आपलेच लोक घाण पसरवतायत ही फार लज्जास्पद गोष्ट आहे. जर आपल्याला स्वच्छ देश हवा असेल, तर लोकांना त्यांच्या सवयी बदलाव्या लागतील.” दुसऱ्या एकाने लिहिले, “ही चुकीची मानसिकता आहे. लोकांना वाटतं की, पर्यटनस्थळं स्वच्छ ठेवणं हे सरकारचं काम आहे; परंतु ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारीदेखील आहे.” तिसऱ्याने लिहिले, “जोपर्यंत आपण आपले विचार बदलत नाही तोपर्यंत आपण देश स्वच्छ ठेवू शकणार नाही.”