आपली चोरी पकडली जाऊ नये यासाठी कोणताही चोर खबरदारी घेण्याबरोबर शक्कलदेखील लढवत असतो. त्यातून हल्ली सगळीकडेच सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने चोर अधिकच सजग झालेत. सीसीटीव्हीत चुकूनही आपण कैद झालो तर तुरूंगवारी नक्कीच. तेव्हा आपल्या ‘सुपिक’ डोक्यातून निघालेल्या एक एक भन्नाट कल्पना वापरून चोर चोरी करतात. पण, सगळेच काही ‘स्मार्ट’ थोडीच असतात. काही चोर असेही असतात की कधी कधी मूर्खपणाचा कळस गाठतात. आता या व्हायरल व्हिडिओमधील मूर्ख चोराचेच बघाना!
चोरी पकडली जाऊ नये म्हणून त्याने चेहऱ्यावर टॉयलेट पेपर गुंडाळला. आता असं करण्याची बुद्धी त्याला कुठून आली देव जाणे! टॉयलेट पेपर चेहऱ्यावर गुंडाळून तो आत शिरला खरा, पण त्याआधी आपण एक मोठी चूक केली हे त्याच्या लक्षात आलं नाही. दुकानात शिरण्यापूर्वी चेहऱ्यासमोर कागद पकडून त्याने सीसीटीव्ही यंत्रणा बंद करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नात त्याचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. तेव्हा या अतिहुशार चोराला पकडायला पोलिसांना फार वेळ लागला नाही. त्याच्या या मजेशीर चोरीचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.