Baby Name Reveal Video: आजकाल प्रत्येक आई-वडिलांना आपल्या बाळासाठी काहीतरी खास, हटके आणि लक्षात राहील असं करायचं असतं. मग तो जन्मदिवस असो, मुंज किंवा नामकरण. याच पार्श्वभूमीवर सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय, जो एकदम वेगळा आणि भावनांनी भरलेला आहे. विशेष म्हणजे या नामकरण समारंभात बाळाचं नाव कोणीतरी नातेवाइकांनी नव्हे, तर थेट भगवान श्री गणेशांनी जाहीर केलं.
नामकरणाचा सोहळा म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर येतं ते साधं, पारंपरिक व घरगुती वातावरण… पण कल्पना करा, जर या सोहळ्यात स्वतः भगवान गणेश प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या बाळाचं नाव ठरवलं, तेही एका अद्भुत पद्धतीने! होय, हे ऐकायला जरी फिल्मसारखं वाटत असलं तरीही एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात AI च्या साह्यानं गणपती बाप्पा स्वतः एका ग्रंथातून बाळाचं नाव सांगताना दिसतात. कोण आहे हे बाळ? काय आहे त्याचं नाव? आणि या नावामागचा सुंदर अर्थ? हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही वाटेल, नाव फक्त नाव नसतं, ते एका भावनेचा, श्रद्धेचा व संस्कृतीचा संगम असतो.
एका कुटुंबानं आपल्या बाळासाठी ‘नामस्मरण व नामकरण विधी’ आयोजित केला आणि त्यासाठी वापर केला AI व्हिडीओचा; पण त्यात भर घातली भारतीय परंपरा आणि श्रद्धेची. व्हिडीओमध्ये बाळाचे वडील त्याला हातात घेऊन उभे असतात, आजूबाजूला संपूर्ण कुटुंब उपस्थित असतं. मग सर्वांचं लक्ष जातं एका मोठ्या स्क्रीनकडे आणि सुरू होतो एक भावनिक प्रवास.
स्क्रीनवर एक योगी ध्यानमग्न अवस्थेत दिसतो. अचानक तो डोळे उघडतो आणि एका गूढ गुहेकडे वाटचाल करतो. गुहेमध्ये त्याची भेट होते भगवान श्री गणेशांशी. गणपती बाप्पा त्याला एक प्राचीन ग्रंथ देतात आणि त्यातून एक सुंदर, अर्थपूर्ण नाव निवडतात.
नाव जाहीर होण्याआधी त्या नावाचा अर्थ सांगितला जातो आणि शेवटी ‘ध्रुव’ हे बाळाचं नाव मोठ्या आदरपूर्वक जाहीर केलं जातं. स्क्रीनवर नाव झळकताच सगळ्या पाहुण्यांच्या टाळ्यांचा कडकडाट होतो. हा क्षण केवळ एखाद्या सिनेमासारखा नाही, तर भावनांनी ओतप्रोत भरलेला आणि आयुष्यभर लक्षात राहणारा ठरतो.
सध्या या व्हिडीओला आठ लाखांहून अधिक लाइक्स आणि लाखो व्ह्युज मिळाले आहेत. अनेकांनी कमेंटमध्ये लिहिलं, “इतकं सुंदर आणि संस्कारी नामकरण मी कधी पाहिलं नव्हतं.” काहींनी म्हटलं, “जेव्हा सगळे पाश्चात्त्य पद्धती अंगीकारत आहेत, तेव्हा या कुटुंबानं देवांना सहभागी करून घेत एक आदर्श निर्माण केला.”
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ केवळ तंत्रज्ञान आणि श्रद्धेचं सुंदर मिश्रण नाही, तर संस्कृती आणि नव्या विचारांचा एक प्रेरणादायक संगम आहे.