आपला बॉस आपल्या कामावर कधीच खूष होत नाही. कितीही चांगले केले तरी त्याला ते पटत नाही. त्याला त्यात दोष दिसतो. त्यामुळे खुश होण्याचा प्रश्नच येत नाही अशी तक्रार अनेकांची असते. त्यातून सण किंवा बढतीची वेळ आली की बॉस आपला हात नेमका आखडता घेतो अशी आणखी एक तक्रार कर्मचा-यांची असते. अशा कर्मचा-यांना आपला बॉस गॅरी बर्टच सारखा असावा असे वाटले नाही तर नवलच. कारण आपल्या कर्मचा-यांच्या कामावर हा बॉस इतका खूश झाला आहे की कंपनीतल्या ८०० कर्मचा-यांना घेऊन तो ५ दिवसांच्या सहलीला जाणार आहे.
वाचा : बहारिनचे दिलदार परराष्ट्रमंत्री, मोलकरणीचे मानले आभार
कंपनीच्या फेसबुकपेजवर याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे ९ जानेवारी ते १३ जानेवरीपर्यंत या सा-या कर्मचा-यांना घेऊन गॅरी कॅरेबियन बेटांवर सहलीसाठी जाणार आहे. त्यांच्या कंपनीत ८०० हून अधिक कर्मचारी काम करतात. आर्थिक मंदीच्या काळात या कंपनीला देखील तोटा सहन करावा लागला होता. या मंदीच्या कचाट्यातून आपल्या कंपनीला बाहेर काढण्यासाठी त्यांनी कर्मचा-यांना काही लक्ष्य दिले होते. जर कर्मचा-यांनी या वर्षांत अपेक्षित लक्ष्य गाठले तर त्यांना खास भेट दिली जाईल असे वचन गॅरीने दिले होते. कर्मचा-यांनी देखील दिवस रात्र मेहनत करून चांगले काम केले. कंपनीनेही यावर्षांतील आपली अपेक्षित ध्येय पूर्ण केली. त्यामुळे या सगळ्या कर्मचा-यांना नववर्षांत कॅरेबियन बेटांवर ते फिरायला घेऊन जाणार आहे. यासाठी चार विमाने त्यांनी तयार ठेवली आहेत. हे सारे कर्मचारी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार आहे. त्यामुळे कामावर खूश होऊन सुंदर भेट देणारा बॉस आपल्याला मिळाला तर असा विचार आता मनात आल्यावाचून राहणार नाही हे नक्की!