Goa Boycott Viral Post : गोवा हे राज्य तिथल्या अथांग समुद्रकिनारे आणि नयनरम्य नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे दरवर्षी देश विदेशातील लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात. अनेकांना गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर रोमांचक नाईटलाइफचा आनंद घेण्याची फार इच्छा असते, त्यामुळे दरवर्षी अनेक जण मित्र-मैत्रिणींसह गोवा एन्जॉय करण्याचा प्लान करतात. पण, याच गोव्यातील पर्यटनाबाबत एका सोशल मीडिया युजर्सने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने गोव्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. या पोस्टमुळे आता गोव्यातील पर्यटनाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गोव्यातील पर्यटनाबाबत एक्सवर आदित्य द्विवेदी नामक एका युजरने पोस्ट केली आहे, ज्याने अलीकडेच गोव्याला भेट दिली होती. या भेटीनंतर त्याने गोव्याची आग्नेय आशियातील इतर ठिकाणांशी तुलना करत गोवा हे अस्वच्छ पर्यटस्थळ असल्याचे वर्णन केले. तसेच त्याने मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे एकप्रकारे छळ असल्याची टीका केली. इतकेच नाही तर त्याने या सर्व अनुभवानंतर भारतीयांना गोव्यावर बहिष्कार टाकावा असे आवाहन केले आहे.

“फुकेत, बाली, श्रीलंका, फिलिपिन्ससारख्या ठिकाणांच्या तुलनेत गोवा अतिशय घाणेरडे”

त्याने आपल्या पोस्टमध्ये, दक्षिण पूर्व आशियातील लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणजे फुकेत, बाली, श्रीलंका आणि फिलिपिन्ससारख्या ठिकाणांच्या तुलनेत गोवा हे राज्य अतिशय घाणेरडे असल्याचे म्हटले आहे.

तसेच गोव्यातील महागडी हॉटेल्स आणि कॅबचालकांकडून होणारी जादा भाड्याची वसुली यावरूनही टीका केली आहे. हॉटेल आणि कॅब फक्त पर्यटकांना लुटण्यावर लक्ष केंद्रित करतात असे त्याने म्हटले. याशिवाय त्याने गोव्यातील क्लब, समुद्रकिनारे यावरही सडकून टिका केली आहे. त्याने लिहिले की, गोव्यातील क्लब मला आवडले नाहीत. या ठिकाणी क्लबमध्ये जास्त शुल्क आकारतात, तसेच इथे वे हाऊस, ट्रान्स, टेक्नो प्ले नाही वाजवत; फक्त हिंदी गाणी वाजवतात.

मला समजत नाही, लोक गोव्याला का येतात? इथले समुद्रकिनारे (Goa Beach) खूप गर्दी, गलिच्छपणा आणि पर्यटकांनी भरलेले असतात. त्याच्या या पोस्टवर गोव्यातील एका रहिवाश्याने चांगलेच सुनावले आहे. उत्तर भारतीयांनी फुकेत, बाली येथे स्थलांतरित व्हावे, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. मी गेल्या ३० वर्षांपासून गोव्याला जात आहे आणि ते कसे आणि का बिघडले हे मी पाहिले आहे.

सोशल मीडियावर युजर्सच्या कमेंट्स

एका युजरने लिहिले की, मला गोवा आवडत नाही, तुम्ही नमूद केलेल्या कारणांसाठी नाही, पण मला गोवा हे कंटाळवाणे वाटते.

दुसऱ्या एका युजरने लिहिले की, बेस्ट हॉटेल्स, व्ह्यू, फूड, क्लब, इंटरटेन्मेंट, स्पॉट्स पाहायचे असतील तर तुम्ही ५५-५७ हजारांमध्ये सात दिवसांसाठी व्हिएतनामला जाऊ शकता. तिथे दोन नागांचा एक समुद्रदेखील प्रसिद्ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौथ्या युजरने लिहिले की, मी व्हिएतमान, थायलंडला भेट दिली; हे देश गोव्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत हे मी आवर्जुन सांगतो. तुम्ही तुमच्या आयुष्यातील चांगला वेळ इथे घालवू शकता.
शेवटी एका युजरने म्हटले की, गोवा हे फसवणुकीचे ठिकाण आहे. गॉल, दा नांग, फुकेत ही ठिकाणे स्वच्छता, हॅप्पीनेस देणारी ठिकाणं आहेत, तसेच स्वस्त आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा छळ होत नाही, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला हिंदी येत नसेल तर कोणी तुमच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही.