Hippos Save Wildebeest From Crocodiles Video Viral : निसर्गात जीवन आणि मृत्यूचा खेळ दररोज सुरू असतो. यासंबंधीचे अनेक व्हिडीओ रोज सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. त्यात विशेषत: प्राण्यांचे व्हिडीओ अधिक असतात. सध्या एका सांबराचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये त्याची जगण्यासाठीची धडपड दिसून येतेय. मृत्यूच्या दारात असताना जीव वाचण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो ते त्यामधून दिसतेय. एका सांबरावर मगर जोरदार हल्ला करते. त्याला जबड्यानं पकडण्याचा प्रयत्न करते; पण ते कसंबसं त्यातून सुटतं. पुढे ते पाणगेंड्यांच्या कळपात जाऊन फसतं. त्यानंतर पुढे असं काही घडतं की, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
मगरीनं सांबरावर केला जोरदार हल्ला
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नदीकाठावर एका मगरीनं सांबरावर जोरदार हल्ला केला, सांबराची शिंगं आपल्या जबड्यात पकडून, ती त्याला फाडण्याचा प्रयत्न करीत होती. यावेळी सांबराचीही जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू होती. सांबरालाही मगरीच्या जबड्यातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य वाटत होतं; पण तेवढ्यात नदीत असलेला पाणगेंड्यांचा कळप त्या ठिकाणी येतो. एक पाणगेंडा मगर आणि सांबराच्या दिशेनं वेगानं येतो. शरीराचं भलंमोठं धूड व शक्ती यांचा वापर करून, तो मगरीला घाबरवतो आणि नेमक्या त्याच संधीचा फायदा घेऊन सांबर मगरीच्या जबड्यातून स्वतःची सुटका करून घेऊन, तिथून पळून जातं.
पण पुढे हेच सांबर पाणगेंड्यांच्या कळपात अडकतं. हा कळप सांबराला घेरतो; पण पुढे ते तिथूनही पळ काढून सुखरूपरीत्या बाहेर पडतं.
सांबराचा हा व्हिडीओ एक्सवर @AMAZlNGNATURE नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. अनेकांनी पाणगेंड्यानं केलेल्या मदतीचं कौतुक केलं आहे. एका युजरनं लिहिलंय की, हा व्हिडीओ निसर्गाचं सौंदर्य आणि प्राण्यांमधील एकता दर्शवितो. दुसऱ्यानं लिहिलंय की, मगरीपासून एका शिकार झालेल्या प्राण्याची सुटका करणं प्रत्येकालाच जमत नाही.