Starbucks Vr Sattar buksh: बहुतेक वेळा जागतिक पातळीवरील बहुराष्ट्रीय कंपन्या जेव्हा स्थानिक स्तरावर उतरतात, तेव्हा छोट्या व्यवसायांना तग धरणे कठीण होऊन बसते. पण, पाकिस्तानातील कराची येथे सुरू झालेल्या एका छोट्याशा कॅफेने दाखवून दिले की, स्थानिक कल्पकता, सांस्कृतिक संदर्भ व चिकाटी यांच्या जोरावर कितीही मोठ्या जागतिक ब्रँडना आव्हान देता येऊ शकते. ही कहाणी आहे ‘सत्तार बुक्श’ कॅफेची, ज्याने अमेरिकन बहुराष्ट्रीय कॉफी चेन स्टारबक्स विरुद्धच्या खटल्यात मोठा विजय मिळवला आहे.

वादाची सुरुवात कशी झाली ?

२०१३ मध्ये रिझवान अहमद आणि अदनान युसुफ या दोन तरुणांनी कराचीमध्ये ‘सत्तार बुक्श’ नावाने कॅफे सुरू केला. त्या काळी पाकिस्तानात स्टारबक्सचे एकही आउटलेट नव्हते. मात्र, या स्थानिक कॅफेचे नाव आणि लोगो स्टारबक्सशी साधर्म्य राखत असल्याचे लक्षात आल्यावर, स्टारबक्स कंपनीने कायदेशीर कारवाई केली. स्टारबक्सचे म्हणणे होते की, सत्तार बुक्श हे नाव आणि त्यांचा लोगो यांमुळे ग्राहकांमध्ये भ्रम निर्माण होऊ शकतो. तसेच त्यांच्या ब्रँडची प्रतिमा व ट्रेडमार्क याला धक्का बसू शकतो.

मात्र, ‘सत्तार बुक्श’चे संस्थापक ठामपणे म्हणाले की, त्यांच्या कॅफेच्या मागे व्यंगचित्रात्मक (satirical) संकल्पना आहे. त्यांनी सांगितले की, लोगोमध्ये अक्षरे, रंगसंगती व प्रतीके यामध्ये मोठ्या फरक दर्शविणाऱ्या बाबी आहेत. ‘स्टारबक्स’च्या जलपरीऐवजी त्यांच्या लोगोमध्ये मिशीवाल्या माणसाचे चित्र होते, तसेच कॉफीऐवजी चहाचे कप दाखवले होते. त्यांनी हेही नमूद केले की, ‘सत्तार बुक्श’ हे नाव पाकिस्तानातील सांस्कृतिक वारशाचा भाग आहे. एका ५०० वर्षे जुन्या अरबी पुस्तकातही या नावाचा उल्लेख आढळतो. म्हणूनच ते नाव कोणत्याही प्रकारे कॉपी करण्याच्या उद्देशाने वापरले गेलेले नाही.

वेगळा मेन्यू आणि त्यांची खासियत.

‘सत्तार बुक्श’ने हेही स्पष्ट केले की, त्यांचा मेन्यू स्टारबक्सपेक्षा पूर्ण वेगळा आहे. येथे फक्त कॉफी नव्हे, तर बर्गर, पिझ्झा दिला जातो. त्यांच्या काही अनोख्या डिशेस सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. उदाहरणार्थ– ‘बेशरम बर्गर’ हा बन्सशिवाय दिला जाणारा खास बर्गर, तसेच ‘LOC पिझ्झा’ ज्यामध्ये एका पिझ्झामध्ये शाकाहारी व मांसाहारी असे दोन्ही टॉपिंग्ज असतात आणि त्याला भारत-पाक सीमेच्या संकल्पनेवरून नाव देण्यात आले आहे.

लोगोची ‘चिकट’ जुळवाजुळव

‘सत्तार बुक्श’चा लोगो सुरुवातीला ‘स्टारबक्स’सारखाच दिसत होता. फरक एवढाच की, जलपरीऐवजी मिशीवाल्या व्यक्तीचे चित्र, कॉफीऐवजी चहाचे कप आणि थोडासा बदललेला फॉन्ट व रंगसंगती. मात्र, नंतर संस्थापकांनी स्वतःहून बदल केले. तसेच, कॅफेमध्ये पाट्या लावून स्पष्ट करण्यात आले की, या कॅफेचा ‘स्टारबक्स’शी काहीही संबंध नाही.

स्थानिकतेचा विजय

शेवटी पाकिस्तानी न्यायालयाने ‘सत्तार बुक्श’च्या बाजूने निर्णय दिला आणि ‘स्टारबक्स’चा दावा फेटाळण्यात आला. सोशल मीडियावर या घटनेचा प्रचंड उत्सव साजरा केला जात आहे. लोक म्हणत आहेत की, हे फक्त एका कॅफेचे नव्हे, तर स्थानिक व्यवसायांचे जागतिक ब्रँड्सवर झालेले मोठे यश आहे. या खटल्यातून हे स्पष्ट झाले की, सांस्कृतिक वैशिष्ट्ये, वेगळा दृष्टिकोन आणि ग्राहकांसोबत जुळवून घेण्याची क्षमता यांमुळे स्थानिक ब्रँड्सही जागतिक दिग्गजांना धक्का देऊ शकतात. ‘सत्तार बुक्श’ने सिद्ध केले की, चिकाटीने केलेल्या प्रयत्नांना कधी ना कधी यश मिळतेच.