IIT-Bombay कॅम्पसमध्ये आता गोशाळा, कारण…

देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या पवईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या कॅम्पस परिसरात गोशाळा उभारण्याचा विचार

देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या पवईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या कॅम्पस परिसरात गोशाळा उभारण्याचा विचार IIT व्यवस्थापन करतंय. दोन दिवसांपूर्वी मोकाट फिरणाऱ्या एका बैलाने आयआयटीच्या एका विद्यार्थ्यांला शिंगांनी अक्षरश: उचलून फेकले. या घटनेत तो विद्यार्थी जखमी झाला होता. या घटनेची आयआयटी व्यवस्थापनाने गंभीर दखल घेतली असून कॅम्पस परिसरात गोशाळा उभारण्याचा विचार व्यवस्थापनाकडून सुरू आहे. त्यासाठी परिसरातील जागेचा शोध घेतला जातोय.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आयआयटी व्यवस्थापनाकडून कँपस परिसरात जागेचा शोध सुरू आहे. ज्या ठिकाणी मोकाट प्राण्यांची देखभाल करता येईल अशा जागेचा शोध सुरू आहे. या जागेची निवड करताना शैक्षणीक कार्यक्रम आणि रहिवासी परिसरावर काहीही परिणाम होणार नाही याचीही काळजी घेतली जाणार आहे. मोकाट गायी-बैलांचा या ठिकाणी नेहमी वावर असतो, त्यामुळे त्यांची अडवणूक करण्यापेक्षा ज्या ठिकाणी त्यांची देखभाल करता येईल अशा जागेचा शोध सुरू असल्याचं आयआयटी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे. मोकाट गायी-बैलांसाठी, त्यांची देखभाल करण्यासाठी निवारा उभारण्याचा विचार आहे, पण त्याला गोशाळा म्हणता येणार नाही अशी प्रतिक्रिया संस्थेकडून देण्यात आली आहे.

आयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’ –

दोन दिवसांपूर्वी पवईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधील (आयआयटी) एका विद्यार्थ्यांला बैलाने उडवल्यामुळे या परिसरात मोकाट फिरणाऱ्या बैलांना पकडण्यासाठी मुंबई महापालिकेचे कर्मचारी गाडी घेऊन गेले असता प्राणिमित्रांनी आणि आयआयटीच्या विद्यार्थ्यांनीच त्यांना विरोध केला. दोनपैकी एका बैलाला या जमावाने पळवून लावले; परंतु एका बैलाला पकडण्यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.

पवईमध्ये मोकाट फिरणाऱ्या एका बैलाने आयआयटीच्या एका विद्यार्थ्यांला शिंगांनी अक्षरश: उचलून फेकले. या घटनेत तो विद्यार्थी जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू आहेत. या घटनेचे गांभीर्य ओळखून सोमवारी पालिकेचे कर्मचारी बैलाला पकडण्यासाठी या परिसरात पोहोचले. मात्र पालिकेची गाडी बैलांना पकडण्यासाठी आली आहे, हे समजताच तिथे प्राणिमित्र रहिवासी आणि आयआयटीचे विद्यार्थी जमले व त्यांनी बैलाला पकडण्यास विरोध केला. या नाटय़ामुळे सकाळी या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पकडलेल्या एका बैलाला या जमावाने आयआयटीच्या संकुलात पिटाळून लावले. आयआयटीच्या अधिकाऱ्यांनीही पालिकेच्या कर्मचाऱ्यांना संकुलामध्ये प्रवेश करू दिला नाही. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अखेर पोलिसांची मदत घेतली. या सगळ्या प्रकारात केवळ एका बैलाला पकडण्यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यश आले. या वेळी विरोध करणाऱ्या प्राणिमित्रांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

बैलाने एका विद्यार्थ्यांला उडवल्याबाबत कोणतीही तक्रार पालिकेकडे आलेली नाही. तरीही केवळ बातमी वाचून पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र तेथील लोकांनी सहकार्य करण्याऐवजी विरोध केल्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही धक्काच बसला आहे. असा प्रकार पुन्हा होऊ  नये म्हणून या परिसरात फिरणाऱ्या मोकाट बैलांना पकडणे आवश्यक आहे. पवईच्या रस्त्यावर खूप वाहतूक असते. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य नागरिकांना, लहान मुलांना अशा बैलांपासून धोका आहे. तसेच हा बैल आक्रमक का झाला, त्याला काही मेंदू विकार झाला आहे का हे तपासण्यासाठी बैलाला पकडणे आवश्यक आहे. प्राणिप्रेम कितीही योग्य असले तरी ते कसे वागतील हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे त्याला पकडणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, पकडण्यात आलेल्या एका बैलाला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असून तपासणी करून त्याला मालाड येथील पालिकेच्या कोंडवाडय़ात पाठवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Iit bombay plans gaushala on campus after bull run incident sas

ताज्या बातम्या