देशभरात १५ ऑगस्ट रोजी ७७ व्या स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. देशभरातील लोकांनी मोठ्या अभिमानाने प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवला. या दिवशी संपूर्ण भारत देशभक्तीच्या भावनेत बुडून गेला होता. पण १५ ऑगस्टनंतर अनेक निष्काळजी लोक देशाचा अभिमान असणारा तिरंगा कुठेही फेकून देताना दिसत आहेत. मात्र, काही लोक असेही असतात जे आपल्या तिरंग्याचे महत्त्व जाणून त्याचा सन्मान करण्यासाठी काहीही करायला तयार असल्याचं दिसत आहेत. सध्या अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो घाणीत पडलेला तिरंगा काढण्यासाठी थेट नाल्यात उतरल्याचं दिसत आहे.

मुलाने घाण पाण्यातून तिरंगा काढला बाहेर –

व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगा घाण पाण्यात पडलेल्या तिरंगा बाहेर काढण्यासाठी नाल्यात उतरल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ जिंदगी गुलजार है नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये शाळेचा गणवेश घातलेला मुलगा तिरंग्याची शान वाचवण्यासाठी नाल्यात उतरतो आणि घाण पाण्यात पडलेले सर्व ध्वज बाहेर काढतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी या मुलाचे मनापासून कौतुक करत आहेत. शिवाय त्याच्या या कृतीने अनेकांची मन जिंकल्याचं दिसत आहे. कारण या व्हिडीओवर अनेकजण चांगल्या कमेंट करत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ अनेकांना भावल्याचं पाहायला मिळत आहे.

“तिरंगा आमचा अभिमान”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये, “तिरंगा कधीही खाली पडू देऊ नका.” असं लिहिलं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ७४ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. तर व्हिडिओवर कमेंट करून लोक या मुलाच्या कामाला सलाम करत आहेत. एका यूजरने लिहिले, “या मुलाला सलाम.” तर दुसऱ्याने लिहिलं, “मी सर्वांना हात जोडून विनंती करतो, जर तुम्हाला ध्वज हाताळता येत नसेल तर तो विकतही घेऊ नका.” तर तिसऱ्याने ‘ध्वजाचा मान राखा, तो आमचा अभिमान आहे’ असं लिहिलं आहे.