Indian Family in USA News: नवीन घर, गृहप्रवेश आणि पारंपरिक हवन… हे सगळं अगदी नियोजनाप्रमाणे सुरू होतं. अमेरिका, टेक्सासमधील एका भारतीय कुटुंबानं त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेशासाठी खास हवन पूजेचं आयोजन केलं होतं. परंतु, या धार्मिक विधीनंतर जे घडलं, त्याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती.
गृहप्रवेशाच्या शुभ प्रसंगी एक भारतीय कुटुंब करीत होतं पारंपरिक हवन… सगळं अगदी विधीनुसार सुरू असताना अचानक जोरजोरात सायरन वाजू लागला. क्षणभर कुणालाच समजेनासं झालं की काय घडलं… अगदी समोर फायर ब्रिगेडची गाडी उभी ठाकली आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घरात प्रवेश केला. सेकंदभरासाठी त्यांना वाटलं की, कुणीतरी चुकीची माहिती दिली की काय? पण जेव्हा अधिकाऱ्यांनी आत पाहिलं, तेव्हा समोर दिसलं अगदीच वेगळं दृश्य… धुराच्या ढगांमध्ये हरवलेलं हवनकुंड, मंत्रोच्चारांचा आवाज आणि प्रसन्न वातावरण.
हवन सुरू असताना घरातून अचानक दाट धूर बाहेर येऊ लागला. याच वेळी शेजारचे जॉन काका जे सकाळच्या कॉफीबरोबर वृत्तपत्र वाचत होते त्यांना काहीतरी ‘गडबड’ वाटली. त्यांना तो धूर पाहून वाटलं की, शेजारील घरात आग लागली आहे. त्यांनी एक क्षणही न दवडता, थेट ९११ वर कॉल केला.
मग केवळ काही मिनिटांत, सायरन वाजवत टेक्सास येथील फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सगळीकडे एकच धावपळ सुरू झाली. पण, जेव्हा फायर फायटर्सनी घरात पाऊल ठेवलं, तेव्हा त्यांचं आश्चर्यचकित होणं अपरिहार्य होतं. कारण- त्यांच्यासमोर धगधगतं हवनकुंड होतं आणि घरात शांतपणे धार्मिक पूजा सुरू होती. फायर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना वाटलं होतं की, इथे मोठी आग लागलीये… पण जेव्हा त्यांना समजलं की, हे एक पवित्र धार्मिक विधीचं दृश्य आहे, तेव्हा तेही गोंधळून गेले. अगदी त्यांच्या प्रतिक्रिया आणि संवादही ऐकण्यासारखे होते.
फायर ब्रिगेडचे कॅप्टन स्मिथ हे हवन पाहून गोंधळलेच. ते म्हणाले, “हे काहीतरी नवीन आणि विचित्र प्रकार आहे का?” तेव्हा घरमालक शर्माजींनी हसत उत्तर दिलं, “नाही साहेब, ही तर आमची पारंपरिक हवन पूजा आहे. फक्त थोडा धूर जास्त झाला!”
जरी हवन धार्मिक विधी असला तरी टेक्सासमधील फायर सेफ्टी नियम कडकच. कॅप्टन स्मिथ म्हणाले, “धूर दिसला की, आमचं कर्तव्य आहे तिथं पोहोचणं. मग ती पवित्र अग्नी असो किंवा किचनची आग!”
मग फायर फायटर्सनी आग विझवण्याऐवजी खिडक्या उघडून, पंखे लावून धूर कमी केला. पूजा पूर्ण झाल्यानंतर शर्माजींनी फायर फायटर्सना प्रेमानं लाडू आणि चहा दिला. ही घटना सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि टेक्सासमधील एका भागात भारतीय संस्कृतीचं सुंदर दर्शन घडवलं.