भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे सेवांमध्ये चौथा क्रमांकावर आहे. भारतातील या रेल्वे सेवेला चालवण्यासाठी लाखो कामगार रात्रंदिवस मेहनत घेत असतात. पण, रेल्वे प्रशासनातील काही अधिकारी अशा काही कठीण जबाबदाऱ्या पार पाडत असतात, ज्याचा तुम्ही विचार करू शकत नाही. दरम्यान, रेल्वेतील स्टेशन मास्तरचे काम हे सर्वात कठीण काम असल्याचे सांगितले जाते. ट्रेन वेळेत आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय स्थानकांवर येतात का किंवा सुटतात, याची माहिती घेण्याची जबाबदारी स्टेशन मास्तरांची असते. याशिवाय देखील स्टेशन मास्तर एकाचवेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असतो. त्यांचे हे काम प्रवाशांसमोर येण्यासाठी एका रेल्वे अधिकाऱ्याने स्टेशन मास्तरच्या डेस्कचा एक फोटो शेअर केला आहे, जो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वेच्या प्रशस्ती नावाच्या एका रेल्वे अधिकाऱ्याने एक्सवर स्टेशन मास्तरच्या डेस्कचा एक फोटो शेअर केला. या फोटोत स्टेशन मास्तरच्या डेस्कवर एक ओपन रजिस्टर दिसतेय. त्याभोवती जवळपास १० फोन आहेत. अधिकाऱ्याने लिहिले की, “स्टेशन मास्टर्स डेस्क. यापेक्षा कोणतं व्यग्र प्रोफेशन आहे मला दाखवा.”

रेल्वे अधिकाऱ्याचे हे ट्विट खूप व्हायरल होत असून युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक युजर्सनी रेल्वेने त्यांचे काम सोपे करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे म्हटले आहे.

दरम्यान, स्टेशन मास्तर वेळापत्रकानुसार ट्रेन धावतेय की नाही हे पाहण्याव्यतिरिक्त रेल्वेचे ट्रॅफिक सिग्नल नियंत्रित करणे आणि प्रवाशांच्या सुरक्षेची हमी देण्यापासून ते स्टेशन कर्मचाऱ्यांचे पर्यवेक्षण आणि कार्यक्षम स्टेशन ऑपरेशनची हमी देण्यापर्यंत अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असतो.

स्टेशन मास्तरच्या कामासंदर्भातील या पोस्टवर भारतीय रेल्वेचे अधिकारी अनंत रुपनागुडी हे म्हणाले की, फोन हाताळण्याव्यतिरिक्त, स्टेशन मास्तरला MSDAC/EI VDU (व्हिज्युअल डिस्प्ले युनिट) देखील पहावे लागते, यातून सिग्नलनुसार पॉइंट योग्यरित्या संरेखित झाले आहे की नाही हे पाहायचे असते.

एका युजरने सांगितले की, “ठरलेल्या वेळी स्टेशन मास्तर किमान तीन व्यक्तींच्या संपर्कात असतो. शेजारील स्टेशनचे दोन स्टेशन मास्तर आणि सेक्शन कंट्रोल कंट्रोलर. त्याला टॉयलेटला जायचे असले तरी त्याच्यासमोर एकच पर्याय असतो, पळत जायचे आणि काही मिनिटांत परत यायचे. संपूर्ण संवाद रेकॉर्ड केला जातो.

यावर दुसरा एक युजर म्हणाला की, कदाचित हे डेस्क नवी दिल्ली किंवा कानपूर सेंट्रलचे आहेत. यात अनेकांनी रेल्वे प्रशासनातील हे काम पाहून आधुनिकीकरणाची गरज आहे, असे मत मांडले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railway officer shared picture of station master desk netizens says torcher job sjr
First published on: 08-02-2024 at 13:39 IST