Indian Railway Shocking Video : भारतीय रेल्वे प्रवाशांना सेवांच्या बाबतीत किती निष्काळजी आहे हे तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. अनेकदा प्रवासादरम्यान तुम्हाला वाईट रेल्वे सेवांचा अनुभव आलाच असेल. प्रवाशांनी कितीही महागड्या ट्रेनचे किंवा कोचचे तिकीट काढो, त्यांना अडचणींचा सामना करावा हा लागतोच. यादरम्यान, सोशल मीडियावरही ट्रेन्समधील त्रासदायक घटनांचे रोज अनेक फोटो, व्हिडीओ किंवा प्रवाशांच्या वाईट अनुभवांच्या पोस्ट पाहायला मिळतील. त्यातील बहुतेक तक्रारी ट्रेनमधील वाढती गर्दी, विनातिकीट प्रवासी आणि राखीव जागांवर जबरदस्तीने बसणाऱ्या प्रवाशांविषयी असतात. असे प्रकार ट्रेन्समध्ये रोज घडतात. दरम्यान, या मुद्द्यावर एका प्रवाशाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो पाहून अनेकांनी रेल्वे प्रवासासाठी मग दोन-दोन महिने आधी तिकीट बुकिंग करून फायदाच काय, असा संतप्त सवाल केला आहे.
विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची टीटीईसमोर मुजोरी
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, विनातिकीट प्रवासीदेखील आरक्षित आसनावर जबरदस्तीने बसतात. त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, तर ते अरेरावीची भाषा करीत, धमक्या देण्यास सुरुवात करतात. अनेकदा हा अनुभन जनरल कोचमध्ये येतो; पण आता प्रवाशांना स्लीपर आणि अगदी एसी कोचमध्येही अशाच धक्कादायक समस्येला तोंड द्यावे लागतेय. दरम्यान, सोशल मीडियावर आता ग्वाल्हेर-बरौनी एक्स्प्रेस ट्रेनच्या स्लीपर कोचमधील एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला नक्की हा स्लीपर कोच आहे की जनरल, असा प्रश्न पडेल. त्यानंतर टीटी आणि रेल्वे पोलीस झोपा काढतायत का, असाही प्रश्न पडेल.
रेल्वे प्रशासनाकडून शून्य कारवाई
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका स्लीपर कोचमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे, अनेकांना नीट उभे राहण्यासाठीही जागा नाही. त्यात अनेक जण तिकीट नसतानाही दुसऱ्या प्रवाशाच्या कन्फर्म सीटवर आरामात बसले आहेत. त्यावर आरक्षित तिकीट असतानाही सीटवर बसता न आल्याने संतापलेल्या एका प्रवाशाने व्हिडीओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यावर त्याने सांगितले की, तिकीट असून बसण्यास न मिळाल्याने त्याने टीटीईकडेही तक्रार केली; परंतु अनेक वेळा सांगूनदेखील कोणतीही कारवाई झाली नाही.
सुविधांच्या नावाखाली प्रवाशांना अडचणींचा नाहक त्रास
या व्हिडीओमध्ये टीटीईदेखील गर्दीत धक्के घाताना दिसतो, ज्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट होते. अशा परिस्थितीमुळे केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच त्रास होत नाही, तर ट्रेनच्या संपूर्ण कामकाजावरही परिणाम होतो. दरम्यान, रेल्वे तिकिटांचे पैसे घेऊन गप्प बसते; पण सुविधांच्या नावाखाली प्रवाशांना या अडचणींचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे प्रवासी आता चांगलेच संतापले आहेत. तसेच रेल्वे या गोष्टी कधी आणि कशा प्रकारे रोखणार, असा सवालही प्रवासी करीत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @ksandip_09 नावाच्या एका युजरने शेअर केला आहे. हजारो लोकांनी तो पाहिला आणि त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, लाखो प्रवाशांना अशा अनेक प्रकारच्या समस्येला तोंड द्यावे लागतेय. दुसऱ्याने लिहिले की, भाऊ, काहीही झाले तरी तिकीट नसलेले लोक कधीही सुधारणार नाहीत. तिसऱ्याने लिहिले की, स्लीपर विसरून जा, आता एसीमध्येही तीच अवस्था दिसून येते. त्याशिवाय इतर अनेक लोकांनी यावर कमेंट्स करून, आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.