Railway Station Dirty Water Video : भारतीय रेल्वेने रोज लाखो प्रवासी प्रवास करतात; पण प्रवाशांना किती घाणेरड्या प्रकारच्या सेवा दिल्या जातात हे काही लपून राहिलेलं नाही. अनेकदा रेल्वेतील खाद्यपदार्थांमध्ये अळ्या, उंदीर वावरत असल्याचे आढळते. तर, कधी रेल्वेस्थानकावरील कॅन्टीन, दुकानांमधील खाद्यपदार्थांवर उंदीर, झुरळ आणि इतर किटकांचा मुक्त संचार दिसून येतो. त्याचे अनेक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावरही पाहायला मिळतात. सध्या एका रेल्वेस्थानकातील असाच एक अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला आहे, जो पाहून तुम्ही रेल्वेस्थानकावरील खाणं-पिणं तर सोडा, हात धुण्यासाठी असलेल्या बेसिनमधल्या पाण्यालाही हात लावणार नाही.
रेल्वेस्थानकावरील एका ब्रिजवरून हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे, ज्यात रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी कशी खेळतेय हे स्पष्ट दिसून येतेय. व्हिडीओत एका रेल्वेस्थानकात छतावर पाण्याच्या दोन मोठ्या टाक्या उघड्या ठेवल्याचे दिसतेय. त्याच टाक्यांमध्ये काही माकडं चक्क आनंदाने आंघोळ करतायत.
सोप्या शब्दांत सांगायचे, तर माकडं पाण्याच्या टाक्यांमध्ये उतरून एकमेकांवर पाणी उडवतायत, कधी आत बुडून भिजण्याचा आनंद घेतायत. तुम्ही काळजीपूर्वक पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, हे तेच पाणी आहे, जे स्थानकावरील प्रवासी पिण्यासाठी किंवा विक्रेते, दुकानदार चहा, ज्यूस बनवण्यासाठी वापरतात. हे दृश्य पाहताना मजेशीर वाटत असले तरी प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते फारच वाईट आहे, त्यामुळे व्हिडीओ पाहून लोक तीव्र संताप व्यक्त करतायत. अनेकांनी या टाक्यांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या यंत्रणांवर प्रश्न उपस्थित करीत ताशेरे झोडले आहेत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रेल्वेस्थानकाच्या छतावर ठेवलेल्या एका टाकीत माकडांचा एक समूह आनंदाने अंघोळ करताना दिसत आहे. त्यावेळी जवळच्या रेल्वे पुलावर असलेल्या एका व्यक्तीने हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले, जे आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना नेमकी कुठली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही; पण हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ ayuryogsangam नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून अनेकांनी रेल्वेकडून स्पष्टीकरण मागितले आहे. काही युजर्सनी विनोदाने म्हटलेय की, आता मला समजले की, रेल्वे स्टेशनवरील चहाची चव इतकी तिखट का असते.