अलीकडच्या काही दिवसांत रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या संतापाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत आहेत. प्रवाशांच्या तक्रारींकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, चोरीच्या वाढत्या घटना आणि त्यानंतरचा प्रशासनाचा ढिसाळ प्रतिसाद, यामुळे अनेकदा प्रवाशांचा संयम सुटताना दिसतो. असाच एक धक्कादायक प्रकार इंदौर–दिल्ली प्रवासी ट्रेनमध्ये घडला असून, एका महिलेने स्वतःची पर्स चोरीला गेल्यानंतर संतापाच्या भरात ट्रेनच्या एसी डब्यातील काच फोडली. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ इंदौर–दिल्ली प्रवासी रेल्वेत घडलेल्या प्रसंगावर आधारित आहे. एका महिलेची पर्स चोरी गेल्याने तिने रागाच्या भरात ट्रेनच्या खिडकीची काच फोडली. रेल्वे पोलिस दलाकडून (RPF) तिला कोणतीही मदत न मिळाल्याने तिचा संताप अनावर झाला. या घटनेचा व्हिडीओ प्रवाशांनी मोबाईलवर शूट केला असून, तो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

व्हिडीओमध्ये महिला आपल्या सीटवर बसलेली दिसते आणि तिच्या शेजारी एक लहान मूल आहे. ती हातात ट्रे धरून ट्रेनच्या एसी डब्याच्या खिडकीवर सतत मारत आहे. काही वेळातच काच फुटते आणि आजूबाजूला तुकडे पसरतात. बाहेरून काही प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी हा प्रकार पाहत आहेत, पण महिला थांबण्यास तयार नाही. काही कर्मचारी तिच्या जवळ येऊन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, मात्र ती “माझी पर्स द्या.. विषय संपला!” असं म्हणत आपला राग व्यक्त करत राहते. तिला हे माहीत असूनही की काच फुटल्याने तिला जखम होऊ शकते, तरी ती आपला संताप आवरू शकत नाही.

पाहा व्हिडिओ

या व्हिडीओखाली सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. काही जण महिलेच्या बाजूने बोलत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, रेल्वे अधिकाऱ्यांनी तिचं ऐकलं असतं तर परिस्थिती एवढी बिकट झाली नसती. तिचा संताप योग्य होता, कारण पर्स हरवणं आणि त्यावर मदत न मिळणं हे त्रासदायक असतं.

तर दुसरीकडे अनेकांनी तिच्या कृतीवर टीका केली आहे. सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं हा विरोध व्यक्त करण्याचा योग्य मार्ग नाही, असं त्यांचं मत आहे. काहींनी तिच्या शेजारी असलेल्या मुलाबद्दल चिंता व्यक्त केली आहे — “काच फुटताना त्या मुलाला इजा झाली असती, हे अत्यंत धोकादायक होतं,” असं त्यांनी म्हटलं आहे. रेल्वे प्रशासनाकडून या घटनेबाबत कोणतेही अधिकृत विधान अद्याप करण्यात आलेले नाही. मात्र, हा प्रसंग पाहून प्रवाशांच्या सुरक्षेविषयी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रतिसाद क्षमतेबद्दल नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत.