Infosys Gender And Age Bias: इन्फोसिसच्या टॅलेंट अॅक्विझिशनच्या माजी उपाध्यक्ष जिल प्रेझियन (Jill Prejean) यांनी अमेरिकेन न्यायालयात माहिती देत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. भारतीय वंशाच्या, घरी लहान मुले असणाऱ्या तसेच ५० हुन अधिक वय असणाऱ्या उमेदवारांना नोकरीसाठी निवडू नये असे आदेश देण्यात आल्याबाबत माहिती प्रेझियन यांनी सांगितली आहे. तसेच आपण असे भेदभाव करणारे नियम पाळणार नसल्याचे सांगताच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप सुद्धा प्रेझियां यांनी कोर्टात केले आहेत. यापूर्वी सुद्धा इन्फोसिसवर वय आणि लिंगभेदाचा आरोप केला गेला होता.
इन्फोसिसवर का होत आहेत भेदभावाचे आरोप?
प्रेझियन यांनी इन्फोसिसचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख सल्लागार मार्क लिव्हिंगस्टन आणि माजी भागीदार डॅन अल्ब्राइट व जेरी कुर्ट्झ यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता. यावर इन्फोसिसने जिल प्रेझियन यांनी दाखल केलेला खटला रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली होती मात्र कोर्टाने इन्फोसिसला झटका देत हा प्रस्ताव फेटाळून लावला. लिंग भेद व वयावरून भेदभाव करण्याच्या नियमाचे पालन न केल्याने प्रेझियन यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचीही त्यांनी सांगितले आहे.
इन्फोसिसने त्यांच्या कंपनीत सल्लागार विभागाच्या उपाध्यक्ष म्हणून ५९ वर्षीय जिल प्रेझियन यांची नियुक्ती केली होती. अनेक तज्ज्ञांना इन्फोसिसकडे घेऊन येण्यात त्यांचे योगदान होते मात्र जेव्हा अशाप्रकारचे भेदभाव करणारे नियम अवलंबण्याचा दबाव त्यांच्यावर टाकण्यात आला तेव्हा त्यांनी विरोध केला. यानंतर वरिष्ठांनी त्यांना तिथे काम करणे कठीण केले होते व विरोध वाढू लागल्यावर चुकीचे कारण देऊन त्यांना बडतर्फ कारण्याकत आल्याचे प्रेझियन यांनी सांगितले आहे.
दरम्यान, इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायालयाने इन्फोसिसला ३० सप्टेंबरला २१ दिवसांच्या आत आरोपांचे उत्तर सादर करण्यास सांगितले होते. तक्रारदार म्हणजेच प्रेझियन यांनी पुरावा म्हणून विशिष्ट कमेंट कोणत्या हे सांगितले नसल्याचे म्हणत इन्फोसिसने खटला फेटाळून लावण्याची विनंती केली होती.