Viral Video Cute Moment in Mumbai Local : मुंबई लोकल ही कधीच कोणासाठी थांबत नाही, असे म्हणतात. मुंबई लोकलमध्ये सीटवरून भांडण, दाराजवळ उभ्या राहणाऱ्या प्रवाशांबरोबर वाद, तर कधी कोणाच्या बॅगेची अडचण होऊन चिडचिड करणाऱ्या प्रवाशांचे दर्शन वारंवार होताना दिसते. लोकलमध्ये बसायला जागा मिळाली की, पटकन कानात एअरपॉड्स घालून ते विचारांच्या दुनियेत हरवून जातात. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये सगळ्यांचे टेन्शन दूर करणाऱ्या एका छोट्याशा प्रवाशाची एंट्री पुरुषांच्या डब्यात झाल्याचे दिसते आहे.

‘लहान मुले ही देवाघरची फुले असतात’, असे म्हटले जाते. ही निरागस लहान मुले कुठेही जातात तेव्हा सगळ्यांची दुःखे काही क्षणांसाठी का होईना आपोपाप दूर झाल्याचा अनुभव अनेकांना येतो. मुंबईत आज एका लोकलमध्ये पुरुषांच्या डब्यात ‘या’ चिमुकल्याची एंट्री झाली आणि क्वचितच दिसणाऱ्या प्रत्येक पुरुषाच्या चेहऱ्यावर नकळत स्मित उमटले. सगळे प्रवासी भांडण, कामाचे टेन्शन विसरून त्या चिमुकल्याबरोबर फुग्याने खेळू लागले. प्रत्येक अनोळखी प्रवासी आपला मित्रच आहे, असे समजून तो चिमुकला प्रत्येकाकडे फुगा टाकून त्यांनाही खेळायला भाग पाडत होता.

‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिन’ (Viral Video)

प्रत्येकाची जबाबदारी खांद्यावर घेऊन, ट्रेनच्या धक्काबुक्कीतून कामाला जाणारा, कितीही कोणी वाईट बोललं की, हसून मनात दुःख लपवणारा आणि जे हवं आहे ते इतरांसाठी हसत हसत सोडून देणारा त्या प्रत्येक पुरुषाचा आज मेन्स डे म्हणजेच ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिन’ आहे. तर आजच्या दिवशी पुरुषांची ही हळवी बाजू बघायला मिळणे म्हणजे योगायोगच आहे. व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, आपलं लेकरू समजून ट्रेनच्या डब्यातला प्रत्येक पुरुष त्याच्याबरोबर फुग्याद्वारे खेळताना दिसून आला आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @life_with_bossbaby या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘मुंबई बोलते’, अशी खास कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “प्रत्येक जण त्याच्या दिवसभराच्या समस्यांबद्दल विसरून गेला”, “तो खेळला आणि ते हसले”, “दिल तो बच्चा है जी”, “हा क्षण पाहताच माझ्या चेहऱ्यावर आपोपाप हसू आलं” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.