उत्तर प्रदेशातील पोलीस सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता एका उपनिरीक्षकाने मुलीला रात्री तीन वाजता घरी बोलावल्याने नवीन वादाला सुरुवात झाली आहे. पोलीस आणि पीडित मुलीमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलीस मुलीला रात्री घरी बोलावल्याचं पाहायला मिळत आहे. पोलीस मुलीला “घरी ये मी तुला थोडीचं खाणार आहे,” असं म्हणत असल्याचं चॅटमध्ये दिसत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल –

मिळालेल्या माहितीनुसार, रतनलाल नगरमध्ये काही लोकांनी एका व्यक्तीला मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या लोकांनी त्या व्यक्तीला रस्त्यातून उचलून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार मारहाण झालेल्या व्यक्तीच्या भाचीने रतनलाल नगर येथील पोलीस स्टेशनचे प्रभारी शुभम सिंग यांच्याकडे केली. यानंतर त्या व्यक्तीच्या भाचीने तिच्या मामाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला आणि त्याचा शोध घेण्यासाठी मदत मागितली.

रात्री तीन वाजता एकटीला बोलावलं घरी –

मुलीने मदतीसाठी मेसेज केल्यानंतर उपनिरिक्षकाने संबंधित मुलीला रात्री ३ वाजता व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज केला, ज्यामध्ये त्याने लिहिलं होतं, “घरी मी एकटाच आहे, तू घरी ये!” यावर मुलीने रिप्लाय दिला, “घरातील सर्व लोक झोपले आहेत, आता मी कशी येऊ? हे बरोबर नाही.” त्यावर इन्स्पेक्टर म्हणतो, “मी तुला थोडीट खाणार आहे?” इन्स्पेक्टरचा रात्री घरी बोलवण्यामागचा हेतू चांगला नसल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोशल मीडियावर पोलीस आणि पीडित मुलीमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर कानपूर पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला जात आहे. मात्र, हे प्रकरण पोलिस आयुक्तांपर्यंत पोहोचताच त्यांनी चौकशीचे आदेश दिले असून आरोपी पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. तर या घटनेतील आरोपी इन्स्पेक्टरने फोन करून कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. तर ही घटना व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत आरोपी पोलिसावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.