कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप १३५, काँग्रेस ३५, जनता दल (सेक्युलर) ४५ आणि इतर १९ जागा जिंकतील असा अंदाज वर्तवणारे सर्वेक्षण सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे, मात्र केवळ या जागांची बेरीज केली तरीही या वृत्तात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट होते. कर्नाटक विधानसभेच्या केवळ २२४ जागा असताना सर्वेक्षणात तब्बल २३४ जागांचा हिशेब मांडण्यात आला आहे.

‘जनता की बात’ म्हणून मांडण्यात आलेली ही आकडेवारी प्रत्यक्षात चार दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ‘जन की बात’च्या सर्वेक्षणात फेरबदल करून प्रसारित केल्याचे कळते. ते सर्वेक्षण कर्नाटकातील सुमारे १.२ लाख मतदारांशी बोलून करण्यात आले होते. त्यात भाजप १०२ ते १०८ जागा मिळवेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. काँग्रेसला ७२ ते ७४ आणि जनता दल सेक्युलरला ४२ ते ४४ जागांवर विजय मिळेल, असे त्या सर्वेक्षणात दिसून आले होते.

‘जनता की बात’ने आपले सर्वेक्षण विश्वासार्ह असल्याचे भासवण्यासाठी बीबीसीची लिंकही समाविष्ट केली होती, मात्र ती प्रत्यक्षात बीबीसी इंडियाच्या पेजची होती. बीबीसीच्या प्रवक्त्याने हे सर्वेक्षण बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. कर्नाटक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर व्हायरल होत असलेल्या फेक सर्वेक्षणांत यामुळे आणखी एका खोटय़ा सर्वेक्षणाची भर पडली आहे.