Lalbaug Ganpati Visarjan Video: यंदा गेल्या महिन्यात म्हणजेच २७ ऑगस्टला गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि ढोल-ताशांच्या गजरात बाप्पा घरोघरी, मंडळांमध्ये विराजमान झाले. मुंबईत दरवर्षी गणेशोत्सवाची मोठ्या प्रमाणात धामधूम असते. सगळीकडेच अन् आनंदाचं वातावरण असतं.

आज ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचा दिवस. गणरायाचं आगमन होऊन १० दिवस होत आले आहेत. गणेशोत्सवातील सर्वांत भावूक करणारा क्षण म्हणजे गणपती विसर्जन. भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. १० दिवसांनंतर बाप्पा आता सगळ्यांचा निरोप घेणार आहे.

गणपती बाप्पा जसा वाजत-गाजत येतो तसा त्याचा निरोप समारंभसुद्धा तितकाच वाजत-गाजत होतो. अशात गणेशोत्सवात मुंबईतील लालबाग, परळ, गिरगाव म्हणजे गणेश भक्तांसाठी पंढरीच. लाखो भाविक दरवर्षी ठीक ठिकाणाहून मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांना भेट द्यायला येतात. आज बाप्पाचं विसर्जन होणार असून सोशल मीडियावर याचे असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असणारा गणेशगल्लीच्या गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी मंडळातून निघाली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजतोय.

गणेशगल्ली गणपती विसर्जन व्हिडीओ (Mumbaich Raja Visarjan Video)

सोशल मीडियावर सध्या मुंबईचा राजा म्हणजेच गणेशगल्लीच्या गणपती बाप्पाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की गणपती बाप्पाच्या विसर्जनाची धामधुम पाहायला मिळत आहे. हजारोंच्या संख्येने भक्तगण विसर्जनासाठी जमले आहेत. अनेक लोक आपल्या मोबाईलमधून हा क्षण टिपताना दिसत आहेत. मंडळातून बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघाली आहे. बोल बोल २२ फूट वाले की जय, मुंबईच्या राजाचा विजय असो अशा घोषणात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे.

मुंबईचा राजा (Mumbaicha Raja)

मुंबईचा राजा म्हणून ओळखली जाणारी लालबागमधील गणेश गल्लीतील गणेशमूर्ती खूप प्रसिद्ध आहे. दरवर्षी काही ना काही आगळीवेगळी सजावट येथे पाहायला मिळते. १९२८ साली गणेश गल्लीत हा गणपती बाप्पा बसवण्यास सुरुवात केली. गणेशगल्ली गणपती २०२५ ची थीम ही रामेश्वरम मंदिराची (तमिळनाडूतील रामनाथस्वामी मंदिर) प्रतिकृती आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @tejas_sangale_photography या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, सध्या तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल होताच त्याला काहीच वेळात ३६ हजारांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “बाप्पाचा क्षण कॅप्चर करण्यासाठी किती जणांच्या हातात मोबाईल आहेत बघा” तर दुसऱ्यानं “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “मुंबईच्या राजाची मूर्ती कायम प्रभावी असते”