Lalbaugcha Raja Crowd Viral Video: यावर्षी २७ ऑगस्टला गणरायाचं आगमन झालं आणि सर्वत्र जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. मुंबईत दरवर्षी गणेशोत्सवाची मोठ्या प्रमाणात धामधूम असते. सगळीकडेच अन् आनंदाचं वातावरण असतं. अशात मुंबईतील लालबागमधील नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवसापासून मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
लालबागच्या राजाचं दर्शन व्हावं यासाठी भक्तगण लांबचा पल्ला गाठून येतात. रांगेत तासन् तास उभे राहण्याचे कष्ट घेतल्यानंतर कुठे बाप्पाचं दर्शन त्यांना मिळतं. तर दुसरीकडे मोठमोठे व्यापारी, कलाकार, फेमस पर्सनॅलिटी यांच्यासाठी व्हीआयपी दर्शन असतं, ज्यामुळे अगदी काहीच मिनिटांत दर्शन घेता येतं. पण, त्यामुळे सामान्य नागरिकांवर अन्याय होतो आणि हा मनाला सतावणारा प्रश्न अनेकांना पडतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ (Lalbaugcha Raja Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी काही कोळी बांधव आले आहेत. हातात हार नारळ घेऊन ते गणरायाला प्रार्थना करण्यासाठी तिथे पोहोचले आहेत. परंतु तिथे खूप गर्दी असल्याने पोलिस त्यांना अडवताना धक्काबुक्की करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्यासोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आल्या आहेत. आणि ते बाप्पाच्या मूर्तीजवळ जाऊन हात जोडून, मस्तक टेकवून, ते बाप्पाकडे प्रार्थना करताना दिसतायत. व्हिडीओमधला हा फरक नेटकऱ्याच्याही लक्षात आला असल्याने त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @darshan_kheur या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, सध्या तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच व्हिडीओला ‘ज्या कोळी बांधवांनी लालबागच्या राजाची स्थापना केली त्यांना असा मान सन्मान दिला जातो आणि एकीकडे पैसा आहे म्हणून धक्काबुक्की न करता आरामात दर्शन दिलं जातं’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल ३ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला कोळ्यांना हकलवताना शेवटी विसर्जनाला कोळ्यांचे पाय पकडत यायला लागतं ना बोटीत जागा भेटण्यासाठी आणि तुम्ही कोळ्यांना अशी वागणूक देता गणपती बसवला कोळ्यांनी आणि आयडी घालून देव तुमचा होत नाही , इतका माज कसला…. हेच डोळे बघतील सोहळे” तर दुसऱ्यानं “गणपती हा आगरी कोळी लोकांनी बसवला आहे त्यांना पण असं करताय” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “मंडळ लाज बाळगा ज्या राज्याच्या नावावर पैशाचा धंदा लावलाय ना त्या राजाची स्थापना इथल्या कोळी व आगरी समाजाने केली आहे याचा तुम्हाला विसर पडला आहे. पहिला मान हा आगरी कोळ्यांचं.”