Viral video : आजच्या सोशल मीडियाच्या काळात “डॉगेश भाई” नावाचा हा ट्रेंड खूपच लोकप्रिय झाला आहे. या ट्रेंडमध्ये लोक आपले पाळीव कुत्रे काय मजेदार किंवा खास गोष्टी करतात ते व्हिडीओत दाखवतात. अशा व्हिडीओंमुळे कुत्र्यांची चतुराई आणि त्यांच्या मालकांवरील प्रेम दिसते. असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यात दोन कुत्र्यांनी एका छोट्या मुलाला बिबट्याच्या हल्ल्यातून वाचवले आहे.

हा व्हिडीओ तेलंगणामधील असल्याचे सोशल मीडियावर सांगितले जात आहे. लोक म्हणतात की, व्हिडीओमध्ये दिसणारे दोन्ही कुत्रे त्या मुलासोबत रोज शाळेत ये-जा करत असतात, त्यामुळे त्या मुलावर हल्ला झाल्यावर ते दोघेही त्याला वाचवण्यासाठी ताबडतोब धावत आले.

हा व्हिडीओ “डॉगेश भाई” या ट्रेंडखाली टाकण्यात आला आहे आणि पाहणाऱ्यांनी या दोन कुत्र्यांचे कौतुक करत त्यांना खरे हिरो म्हटले आहे. त्यांच्या धाडसाने आणि निष्ठेने सगळेच नेटकरी थक्क झाले आहेत. काहींनी तर कमेंट करून लिहिले की, “अशा प्रामाणिक आणि धैर्यवान कुत्र्यांमुळेच माणूस सुरक्षित वाटतो.” हा व्हिडीओ बघून लोकांना जाणवले की प्राणी फक्त पाळीव नसतात, तर आपल्या कुटुंबाचा एक भाग असतात. त्यांच्यातही भावना, आपुलकी आणि माणसासाठी जीव तोडून लढण्याची ताकद असते.

पाहा व्हिडिओ

व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा शाळेच्या गणवेशात घरी परतताना दिसतो. तो रस्त्यावरून चालत असताना अचानक झुडपातून एक बिबट्या बाहेर येतो आणि त्याच्यावर हल्ला करतो. त्याच क्षणी, दोन कुत्रे धावत आले आणि बिबट्याशी सामना केला. काही क्षणांच्या संघर्षानंतर, कुत्र्यांनी बिबट्यावर मात केली आणि त्याला पळून जाण्यास भाग पाडले. मुलगा सुरक्षित राहतो. या व्हिडीओत कुत्र्यांचे धैर्य आणि माणसांवरील प्रेम स्पष्ट दिसते.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर aka_sandip या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला ५० हजारांहून जास्त लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी व्हिडीओ पाहून या दोन कुत्र्यांचे कौतुक केले आहे आणि त्यांना खरे हिरो म्हटले आहे. तरीही काही लोक म्हणतात की, हा व्हिडीओ एआयने तयार केलेला असू शकतो. एका युजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, “व्हिडीओत इतके लोक दिसत नाहीत, त्यामुळे हा सीन खरा वाटत नाही.” तर काहींनी लिहिले, “काहीही असो, जर हे खरं असेल, तर हे दोन डॉगेश भाई खरंच हिरो आहेत!”

सध्या हा व्हिडीओ खरा आहे की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. काही लोक म्हणतात की ही खरी गोष्ट आहे, तर काहींना ती बनावट वाटते. तरीही सोशल मीडियावर या दोन कुत्र्यांच्या धाडसाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. “डॉगेश भाई” ट्रेंडखाली आलेला हा व्हिडीओ पुन्हा एकदा दाखवतो की प्राणीही कधी कधी माणसांसाठी देवदूतासारखे काम करू शकतात.