Viral video: चित्ता हा सर्वात वेगवान प्राणी आहे. तो ताशी ८० ते १२० प्रती कि.मी. वेगाने पळू शकतो. त्यामुळे समोरील प्राणी कितीही वेगवान असला तरी तो चित्त्याचा सामना करू शकत नाही. अशाच चित्त्यांचा एक कळप मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या जौरा परिसरातील पगारा धरणाजवळ भटकताना दिसला. एक नाही दोन नाही तर तब्बल पाच चित्ते भटकताना दिसले. उघड्यावर त्यांच्या उपस्थितीमुळे गावकरी आणि ये-जा करणाऱ्यांमध्ये घबराट पसरली. सकाळी फिरायला गेलेल्या स्थानिकांना रस्त्याच्या मधोमध चित्ते पाहून धक्का बसला. काही लोक पळून गेले आणि लपले, तर काहींनी व्हिडिओ रोकॉर्ड करण्यात यश मिळवले.
डेप्युटी रेंजर विनोद कुमार उपाध्याय यांच्या मते, हे चित्ते कैलारसहून आले होते आणि पगारा धरण परिसरात विश्रांती घेताना दिसले. वन विभागाला त्यांचे ठिकाण कळताच, एक पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या हे चित्ते कोठी आणि जोगी देवगड सारख्या गावांजवळ विश्रांती घेत आहेत. दुसरीकडे, ४ प्रशिक्षित चित्ता मित्र (चित्ताची काळजी घेणारे) देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत आणि वन अधिकारी सुरक्षित अंतरावरून बारकाईने लक्ष ठेवून आहेत. वन विभागाने परिसराला वेढा घातला आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. चित्त्यांनी ट्रॅकिंग कॉलर घातले आहेत, ज्यामुळे तज्ञ त्यांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवू शकतात. आतापर्यंत त्यांनी कोणालाही इजा केलेली नाही.
गावकऱ्यांना सतर्कचे आवाहन
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, राष्ट्रीय उद्यानातून अधूनमधून चित्ते बाहेर पडणे असामान्य नाही, परंतु त्यापैकी पाच चित्ते एकाच वेळी बाहेर पडणे ही गंभीर चिंताजनक बाब आहे. यामुळे उद्यानातील सुरक्षा उपाय आणि देखरेखीबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. जवळच्या गावांमध्ये भीती पसरली आहे. लोक घरातच राहत आहेत, आवश्यक असल्यास बाहेर पडत आहेत. चित्त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, हा विषय जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.वन विभागाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे, शेतात एकटे जाऊ नये, मुलांना बाहेर खेळण्यापासून रोखण्याचे आणि चित्ते दिसल्यास त्वरित वन अधिकाऱ्यांना किंवा स्थानिक अधिकाऱ्यांना कळवण्याचे आवाहन केले आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही प्रतिक्रिया देत आहेत.