Buffalo Saves itself From Lion: सिंह म्हणजे जंगलाचा राजा… त्याच्या तावडीत कोणीही अडकलं, की सुटणं अशक्यच. पण कधी कधी नशीब असं काही उलटतं, की शिकार करण्याचा प्रयत्न करणारा सिंहच स्वतःच्या जीवासाठी धावत सुटतो. सोशल मीडियावर असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका सिंहानं म्हशीवर हल्ला केला; पण काही क्षणांत सगळं चित्रच पालटलं.
आपण नेहमी ऐकत आलो आहोत की, जंगलात सिंहाला ‘राजा’ मानलं जातं – त्याचं सामर्थ्य, वेग, धैर्य व शिकारी कौशल्य बघता त्याच्या तावडीत सापडलेला प्राणी सुटणं महाकठीण. येथे एका प्रसंगी असं काही घडलं की, तो बलाढ्य सिंहच आपल्या शिकारीपासून पळून गेला. काय ऐकूनच धक्का बसला ना? अशक्य वाटणाऱ्या या धक्कादायक आणि थरकाप उडवणाऱ्या अशा दृश्याचं दर्शन घडविणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे, ज्यात जंगलाचा राजा म्हणजेच सिंह एका म्हशीवर हल्ला करतो; मात्र काही क्षणांत सगळं गणितच बदलतं. पाण्यानं भरलेल्या दलदलयुक्त मोठ्या खड्ड्यात सुरू झालेली ही जीवघेणी झुंज फक्त दोन प्राण्यांपुरतीच मर्यादित राहत नाही. कारण- काही क्षणांत म्हशींचा एक कळप खूप वेगात येतो आणि त्या सिंहावर आक्रमण करतो. हे दृश्य इतकं चित्तथरारक आहे की, क्षणभरासाठी तुम्हालाही वाटेल – ‘हे खरं जंगलातील युद्ध आहे का?’ ही कहाणी फक्त शिकार आणि शिकाऱ्याची नाही, ही आहे जंगलातील शक्ती, एकजूट व स्फोटक संघर्षाची! पुढे काय घडलं ते वाचा सविस्तर…
सिंहाचा म्हशीवर जोरदार हल्ला
व्हायरल व्हिडीओमध्ये एक गढूळ पाण्यानं भरलेला मोठा खड्डा दिसतो, जिथे एक म्हैस अडकलेली असते. सिंह तिच्यावर हल्ला करीत, तिला खाली पाडण्याचा प्रयत्न करीत असतो. तो तिच्या पायावर जबरदस्त पकड मिळवतो आणि तिला चिखलात झोपवून शिकार करण्याची धडपड करतो. म्हैसही आपला जीव वाचवण्यासाठी झुंज देत असते, ती जोरजोरात ओरडत असते; पण सिंह तावडीत सापडलेली अशी मोठी शिकार कशी सोडणार? तो आपली पकड अधिकाधिक घट्ट करीत तिला नामोहरम करण्याच्या प्रयत्नात असतो.
मग येतो खऱ्या नाट्याचा क्षण…
सिंह शिकारीला हतबल करीत असतानाच, त्या म्हशीची जीव वाचवण्यासाठीची प्राणांतिक किंकाळी ऐकून म्हशींचा एक मोठा कळप त्या घटनास्थळी पोहोचतो. ते दृश्य पाहून सिंह खूप घाबरतो. त्याला लक्षात येतं की, आता त्याची कोंडी झाली आहे. म्हशींच्या त्या कळपाला पाहून आलेल्या प्रचंड ताणामुळे सिंहाला माघार घेण्याशिवाय तरणोपाय राहत नाही आणि अखेरीस तो म्हशीचा पाय सोडून, तिथून जीव वाचवण्यासाठी पळ काढतो.
येथे पाहा व्हिडीओ
जंगलातील सत्तासंघर्षाचा थरारक क्षण
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सिंहासारखा बलाढ्य शिकारीदेखील कधी कधी शिकाराच्या झुंजीत हरतो आणि जीव वाचवण्याची वेळ त्याच्यावर येते, हे या दृश्यातून पुन्हा एकदा सिद्ध होतं.