Lion Viral Video: जंगलाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंहाची दहशत सगळ्यांना वाटते. जंगलातील कुठल्याही प्राण्यापासून माणसं चार हात लांबच राहतात. पण, सिंहाचं नाव जरी ऐकलं तरी अनेकांना घाम फुटतो. जंगली प्राण्यांची ही भीती अनेकांच्या मनात कायम असते.

सोशल मीडियावर अनेकदा जंगली प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात वाघ-सिंहाच्या शिकारीचे, हल्ल्याचे अनेक व्हिडीओ आपण पाहतो. अशात वाघ किंवा सिंहाचा व्हिडीओ आणि फोटो बघणं ठीक; पण आपल्यासमोर अचानक तोच प्राणी आला तर? अशी परिस्थिती कोणावर ओढवली, तर त्या व्यक्तीची स्थिती तिथेच घाबरगुंडीनं अर्धमेल्यासारखी होईल हे नक्कीच.

सध्या असाच एक भयंकर प्रकार एका माणसाबरोबर घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत त्या व्यक्तीबरोबर सिंहाने नेमकं काय केलंय ते पाहा…

सिंहाने वास घेतला अन्… (Lion Attack Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, रस्त्याच्या एका कोपऱ्याला एक माणूस गाढ झोपला आहे. रात्री एका दुकानाच्या बाहेर तो झोपी गेला आहे. तेवढ्यात अचानक एक भलामोठा सिंह तिथे येतो. त्याच्या जवळ जातो. त्याचा वासही घेतो. पण नशीबाने त्याला काहीही न करता तिथून शांतपणे निघून जातो. हे सगळं होत असताना त्या माणसाची झोपमोडदेखील होत नाही. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, ही धक्कादायक घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @priyarajputlive या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्यावर झोपलेली असते. तेवढ्यात एक सिंह चालत येतो. सिंह त्या व्यक्तीचा वास घेतो आणि निघून जातो.” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला ३८ हजारापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हे खूपच धोकादायक दिसतेय!” तर दुसऱ्याने “मला तर हा खोटा व्हिडीओ वाटत आहे, यात किती खरेपणा आहे माहित नाही” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “त्या माणसाचे नशीब चांगलं होतं की सिंहाचं पोट भरलं होतं”