ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रस यांनी सोमवारी भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांचा पराभव करून हुजूर पक्षातील आपल्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे ट्रस या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे. ट्रस यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्रस यांच्या मुंबई दौऱ्यातील काही फोटो पोस्ट करत त्यांना मुंबईबद्दल विशेष प्रेम असल्याचं अधोरेखित करत नव्या पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे यापैकी एका फोटोमध्ये आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ट्रस यांना पैठणी साडी भेट देताना दिसत आहेत.
आदित्य ठाकरेंनी ट्रस यांच्यासोबतचे पाच फोटो ट्विटरवरुन शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी ट्रस यांनी दोनदा मुंबईला भेट दिल्याचं नमूद केलं आहे. दुसऱ्या भेटीदरम्यान त्यांनी मुंबई ट्रस यांच्यासाठी लकी चार्म ठरत असल्याचा उल्लेख केल्याचा प्रसंग सांगितला आहे. “पंतप्रधान निवडून आलेल्या ट्र्स यांनी पूर्वी ट्रेड सेक्रेटरी म्हणून मुंबईला भेट दिली होती. त्यानंतर त्या परत मुंबई आल्या तेव्हा परराष्ट्र सचीव म्हणून. त्यामुळेच मी त्यांच्या या दुसर्या भेटीत मी अगदी सहज उल्लेख करत त्यांना म्हटलं होतं की, मुंबई (मुंबई दौरा) तुम्हाला फायद्याची ठरली असून तुमच्या पुढील प्रवासाचं काही नवल वाटणार नाही असाच तो असेल. आज त्या यूकेच्या पंतप्रधान आहेत.” असं आदित्य यांनी म्हटलं आहे.

अन्य एका ट्वीटमध्ये आदित्य यांनी जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत आदित्य आणि किशोरी पेडणेकर ट्रस यांना पैठणी भेट देताना दिसत आहेत. “हुजूर पक्षातील पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये विजयी झाल्याबद्दल ट्रस यांचं अभिनंदन. मला आशा आहे की त्या भारत आणि ब्रिटनमधील संबंधांना पुढे घेऊन जातील. दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवेल,” असं आदित्य म्हणाले आहेत.

ट्रस यांना किती मतं मिळाली?
हुजूर पक्षाच्या सदस्यांनी ऑनलाइन आणि टपालाद्वारे १७२,४३७हून अधिक मतदान केले. त्यात ट्रस यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी सुनक यांचा पराभव केला. मावळते पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या जागी आता ४७ वर्षीय ज्येष्ठ कॅबिनेटमंत्री असलेल्या ट्रस या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनतील. भारतीय वंशाची पहिली व्यक्ती ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याची ऐतिहासिक आशा सुनक यांच्यामुळे निर्माण झाली होती, मात्र ट्रस यांच्या विजयाने सुनक यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न भंगले ट्रस जिंकल्या असल्या तरी अनेकांनी बांधलेल्या आडाख्यांप्रमाणे त्यांचा विजय ऐतिहासिक नाही, अशी टिप्पणी बीबीसी वृत्तवाहिनीने केली आहे. देशासमोरील आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी अर्थमंत्री राहिलेल्या सुनक यांनी करवाढीच्या योजना लागू केल्या होत्या. त्या मागे घेण्याचे वचन ट्रस यांनी दिले होते. त्यांच्या विजयात या आश्वासनानेच महत्त्वाची कामगिरी बजावल्याचे मानले जाते.
पक्ष सदस्यांची ट्रस यांना ८१,३२६, तर सुनक यांना ६०,३९९ मते मिळाली. या वेळी विक्रमी ८२.६ टक्के मतदान झाले. एकूण पात्र १७२,४३७ मतांपैकी ६५४ मते बाद झाली. याचा अर्थ ट्रस यांनी अगदी चांगल्या फरकाने विजय मिळवला. पराभवानंतर सुनक यांनी लगेचच ट्वीट संदेशाद्वारे पक्षात एकजुटीची गरज व्यक्त केली. ‘‘मला मतदान करणाऱ्या प्रत्येकाचा मी आभारी आहे. निवडणुकीत हुजूर पक्ष हे एक कुटुंब आहे, यावर भर दिला होता,’’ असे सूचक विधान सुनक यांनी केले.
ट्रस यांनी विजयानंतर केलेल्या भाषणात देशावरील ऊर्जेचे संकट दूर करण्याची आणि नोकऱ्यानिर्मितीची ग्वाही दिली. ट्रस यांनी प्रतिस्पर्धी सुनक यांचे आभार मानले, तर मावळते पंतप्रधान जॉन्सन यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘‘बोरिस तुम्ही ब्रेग्झिट प्रत्यक्षात करून दाखवले. तुम्ही विरोधी पक्षनेते जेरेमी कॉर्बीन यांच्यावर मात केली. तुम्ही करोना लस आणली आणि तुम्ही व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात उभे राहिलात. कीवपासून कार्लिसलपर्यंत तुमची प्रशंसा करण्यात आली,’’ असे ट्रस म्हणाल्या.