सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक लोकांना आपला जोडीदार ऑनलाईन मिळाल्याचं आपण पाहतो. फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मुला-मुलींची मैत्री होते आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं. शिवाय या ऑनलाईन प्रेमाला आता राज्याच्या किंवा देशाच्या सीमा उरल्या नाहीत. कारण थेट पाकिस्तानातून आपल्या प्रियकरासाठी भारतात आलेल्या सीमा हैदरची प्रेम कहाणी तुम्हाला माहिती असेलच. अशातच आता आणखी एक अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. ज्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील एक मुलगी फेसबुकच्या माध्यमातून बिहारमधील एका मुलाच्या प्रेमात पडली. जो सध्या मुझफ्फरपूर येथे रेल्वे पोलिसात हवालदार म्हणून तैनात आहे. मुलगी घरातून पळून तिच्या मुझफ्फरपूरला प्रियकराकडे आली. यावेळी तेथील एसपीने दोघांची प्रेमकहाणी ऐकली आणि त्यांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला.
आज तकच्या रिपोर्टनुसार, बलिया येथील मुलगी लखनऊमध्ये शिक्षणासाठी राहत होती. यावेळी तिची फेसबुकवर कॉन्स्टेबल विकास कुमार नावाच्या तरुणाशी ओळख झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. यानंतर तरुणीने विकासशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ती थेट मुजफ्फरपूरला आली आणि विकासलला तिच्या मनातील इच्छा बोलून दाखवली, यावर विकासही लग्नासाठी तयार झाला.
मुलगी आणि विकास दोघेही एसपी रेल्वे डॉ. कुमार आशिष यांच्या ऑफिसमध्ये आले आणि त्यांनी दोघांच्या प्रेम प्रकरणाची संपूर्ण माहिती त्यांना दिली. यानंतर एसपींनी त्यांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. एसपींच्या आदेशावरून असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे स्टेशनमध्ये असलेल्या एका मंदिरातच दोघांच्या लग्नाची तयारी केली. बिहार पोलीस मेन्स असोसिएशनचे अध्यक्ष रुपनारायण यादव यांनी सांगितलं की, या दोघांचे लग्न आधी मंदिरात पार पडलं त्यानंतर कोर्टात कायदेशीर पद्धतीने लग्न करण्यात आलं. तर सध्या या आगळ्यावेगळ्या प्रेमप्रकरणाची आणि लग्नाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सरु आहे.